राजू शेट्टी यांची मंत्री मलीक यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा सुक्ष्मपतपुरवठा (महिला बचत गट) समाजातील मान्यताप्राप्त बचत गटांनाही सुरू करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचेकडे केली.
अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय मुंबईच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाच्या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक मागासलेल्या लोकांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यापैकीच मागील महिन्यामध्ये या विभागाकडून सुक्ष्मपतपुरवठा योजना (महिला बचत गट योजना) सुरू करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. सदर योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, दीनदयाळ अन्तोदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान व ग्रामीण विकास यंत्रणा या संस्था मार्फतच सलग्नग्न असणाऱा महिला बचत गटांना कर्जाचे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही बाब अल्पसंख्यांक समाजातील मान्यताप्राप्त इतर महिला बचत गटांवर अन्यायकारक आहे तसेच सदर योजनेचा लाभ अल्पसंख्याक समाजातील गरीब व होतकरू महिलांना होणे नितांत आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समिती, महिला बालकल्याण विभाग, सामाजिक संस्था शासन अंगीकृत शासन विभागाच्या अंतर्गत स्थापित महिला बचत गटांना महामंडळाच्या सुक्ष्मपतपुरवठा योजनेअंतर्गत कर्जाचे अर्ज वितरीत करून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभाग व महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱयांना निर्देश देण्याची मागणी निवेदनात केली आहे.








