प्रतिनिधी / सातारा :
शहरातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एकाने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कृत्यामुळे मुलगी गर्भवती राहिली असून, संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरीब कुटुंबातील आहे. ती शिक्षण घेत आहे. ही मुलगी घरात एकटी असताना तिच्याच नात्यातील एकाने तिच्यावर अत्याचार केला. याबद्दल कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे मुलीने याची माहिती कोणालाही दिली नाही. याचा गैरफायदा घेत संशयिताने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. गेले तीन महिने हा प्रकार सुरू असल्याने मुलगी भेदरून गेली. ही मुलगी सतत घाबरलेल्या अवस्थेत असल्याने कुटुंबियांनी तिला विश्वासात घेतले असता तिने झालेल्या घटनेची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार ती मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुलीला घेवून शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप संशयिताला अटक झालेली नाही. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुंदर करत आहेत.