प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची पुढील दोन वर्षांसाठी सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्य पोलीस महासंचालकपदी राज्य सरकारने डॉ. अलोक मोहन यांची नियुक्ती केली आहे. सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्यांना ही बढती मिळाली आहे. याआधी अलोक मोहन हे अग्निशमन आणि तातडीची सेवा या विभागाचे पोलीस महासंचालक होते.
राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार अस्तित्वात आलेल्या पहिल्याच दिवशी अलोक मोहन यांची राज्य पोलीस महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. रात्रीच यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला आहे. डॉ. अलोक मोहन हे 1987 कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. याशिवाय त्यांच्याकडे कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला होता.
शशीकिरण शेट्टी राज्याचे नवे अॅडव्होकेट जनरल
राज्याचे नवे अॅडव्होकेट जनरल म्हणून ज्येष्ठ वकील शशीकिरण शेट्टी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते निवृत्त न्यायमूर्ती विश्वनाथ शेट्टी यांचे पुत्र आहेत. त्यांची राज्याच्या अॅडव्होकेट जनरलपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर पत्रकारांशी बोलताना शशीकिरण शेट्टी म्हणाले, अनावश्यक आणि क्षुल्लक दावे कमी करून प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे, कायदा खाते मजबूत करण्यास आपले प्रथम प्राधान्य असेल.









