सोडविण्यासाठी आलेल्या दोघा जणांनाही मारहाण, पाच अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक
प्रतिनिधी \ बेळगाव
क्षुल्लक कारणावरुन अलारवाड (ता. बेळगाव) येथील एका तरुणावर चाकु व रॉडने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री भरतेश कॉलेज जवळ ही घटना घडली असून या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अभिषेक महावीर कडबी (वय 20, रा. अलारवाड) असे चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अमित बाहुबली पंचोडे (वय 23, रा. हलगा), सिध्दार्थ कल्लाप्पा जंगवाड (वय 18, रा. अलारवाड) यांच्यावरही हल्ला करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात भा.दं.वि. 143, 147, 148, 341, 407, 323, 324, 504, 506 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
गुरुवारी रोहित फकिरा पुजारी (वय 19, रा. गांधीनगर) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबरोबरच ताशिलदार गल्ली, खासबाग, समर्थनगर व महाव्दार रोड परिसरातील पाच अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सर्व सहा जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार जखमी अभिषेक व एका अल्पवयीन मुलाची कॉलेजमध्ये मैत्री होती. याच मैत्रीतून बुधवारी आमोरासमोर आल्यावर दोघे बोलले. त्यानंतर भांडण होवून अभिषेकने अल्पवयीन मुलाला एक लगावले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांना बोलावून अभिषेकवर चाकु व रॉडने हल्ला केला. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघा जणांवरही हल्ला करण्यात आला आहे.









