मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत क्रीडा क्षेत्रासाठी 230.78 कोटींची कपात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयातील भव्यदिव्य पराक्रमाचा आवर्जून उल्लेख केला. मात्र, याचवेळी क्रीडा क्षेत्रासाठी मागील वर्षाच्या तुलनेत 230.78 कोटींनी कमी अशी तरतूद केली. मागील आर्थिक वर्षात केंद्राने क्रीडा क्षेत्राकरिता 2826.92 कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद केली होती. त्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 2596.14 कोटी रुपयांची तरतूद आहे. या कपातीचा खेलो इंडिया उपक्रमाला मोठा फटका बसला आहे.
मागील आर्थिक वर्षात 2826.92 कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद जाहीर केली गेली होती. मात्र, नंतर ती प्रत्यक्षात 1800.15 कोटी रुपयांवर आणली गेली. कोव्हिड-19 मुळे क्रीडाजगत जवळपास ठप्प झाल्याने तो निर्णय घेण्यात आला होता. 2020-21 च्या कमी केलेल्या तरतुदीशी तुलना करता यंदाची तरतूद रक्कम 795.99 कोटी रुपयांनी अधिक आहे.
अर्थात, गतवर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकली गेल्यानंतर बहुतांशी राष्ट्रीय स्पर्धा रद्द केल्या गेल्या. त्याचप्रमाणे बहुतांशी ऍथलिटस्साठी विदेशी प्रशिक्षण व विदेशी स्पर्धाही शक्य झाले नव्हते. खेळाडूंचा ऑलिम्पिकमधील सहभाग, विदेशातील सराव, विदेशातील स्पर्धांमधील सहभाग, या सर्वांचा खर्च केंद्र सरकारकडून उचलला जातो.
‘मागील वर्षात विदेशात सराव, स्पर्धांमध्ये सहभाग आदी बाबी आपल्या क्रीडापटूंना शक्य झाले नव्हते. अगदी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरे होऊ शकली नव्हती आणि त्याचप्रमाणे कोव्हिडच्या संकटामुळे पायाभूत सेवासुविधा विकास व स्टेडियम्सचे नूतनीकरण, यातही काहीही प्रगती झाली नव्हती’, असे क्रीडा मंत्रालयातील प्रतिनिधीने नमूद करत मागील वर्षाच्या तरतुदीशी यंदाच्या तरतुदीची तुलना होऊ शकत नाही, असे सूचित केले.
‘साई’साठी वाढीव तरतूद
दरम्यान, यंदा जी तूट जाहीर केली गेली, त्याचा खेलो इंडिया या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मोठा फटका बसणार आहे. खेलो इंडियासाठी 232.71 कोटी रुपयांचा निधी कापला गेला आहे. गतवर्षी या उपक्रमासाठी 890.42 कोटी रुपयांची तरतूद होती. यंदा ती 657.71 कोटी रुपयांवर आणली गेली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला मात्र यंदा वाढीव निधीची तरतूद लाभली आहे. मागील अर्थसंकल्पात त्यांना 500 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यंदा ही तरतूद 660.41 कोटी रुपयांची केली गेली आहे.
राष्ट्रीय शिबिरे भरवणे, पायाभूत सेवासुविधा, आवश्यक साधने उपलब्ध करुन देणे, दळणवळणाची तजवीज करण्यासाठी सहकार्य करणे आदी भारतीय क्रीडा प्राधिकरणाची मुख्य जबाबदारी असते. राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सच्या निधीत यंदा 35 कोटी रुपयांची वाढ झाली असून ती 280 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास फंडात यंदा 25 कोटी रुपयांची कपात जाहीर केली गेली आहे. 2010 राष्ट्रकुल स्पर्धा-साई स्टेडियम्सच्या नूतनीकरणाचा निधी 75 कोटी रुपयांवरुन 30 कोटी रुपयांवर आणला गेला आहे. क्रीडापटूंसाठी राष्ट्रीय कल्याण निधी पूर्वीप्रमाणेच 2 कोटी रुपयांचा असेल. याशिवाय, जम्मू आणि काश्मीरसाठी क्रीडा सेवासुविधांकरिता निधीत कोणताही बदल केला गेलेला नाही.
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण केंद्राला यंदाही 55 कोटी रुपये मिळतील तर वाडाचा निधी 2 कोटी रुपयांवरुन अडीच कोटी रुपये करण्यात आला आहे.
निर्मला सीतारामन यांच्याकडून ऑस्ट्रेलियातील पराक्रमाचा आवर्जून उल्लेख
मागील महिन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन भूमीत ऐतिहासिक कसोटी मालिकाविजय संपादन केला होता. त्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या प्रस्तावनेत आवर्जून उल्लेख केला. देशाची यशश्रीची भूक अशा पराक्रमातून दिसून येते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर असताना अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघासमोर आव्हानांचा डोंगर होता. त्यातच यजमान ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण ताकदीने मैदानात होता. मात्र, यानंतरही रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक मालिकाविजय खेचून आणला होता.
‘भारत क्रिकेटप्रेमी देश आहे. क्रिकेट इथे तळागाळात रुजले आहे आणि विशेषतः या खेळातील युवा फळीने आपल्या खेळाच्या माध्यमातून आश्वासकता व विजयाची, यशश्रीची भूक या पराक्रमाने दाखवून दिली आहे’, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या. हा अर्थसंकल्प सादर केला जाण्यापूर्वी एका दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये देखील भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील पराक्रमाची आवर्जून दखल घेतली होती.
याशिवाय, गत आठवडय़ात मुख्य अर्थ सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी देखील क्रिकेटचे उदाहरण देत त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेत विविध दृष्टिकोन समोर ठेवून कशी नवसंजीवनी देता येईल, हे सोदाहरण स्पष्ट केले होते. ‘क्रिकेटप्रमाणे अर्थव्यवस्थेत देखील नियोजन महत्त्वाचे असते. जेव्हा चेंडू स्विंग होत असतो, त्यावेळी बरीच अनिश्चितता असते. त्यामुळे, काळजीने खेळावे लागते आणि अस्तित्व कायम राखण्यावर भर द्यावा लागतो. चेंडू स्विंग होत असताना चेतेश्वर पुजाराप्रमाणे खेळावे लागते आणि स्विंग निघून गेल्यानंतर ऋषभ पंतप्रमाणे खेळावे लागते’, असे सुब्रमण्यम त्यावेळी म्हणाले होते.
काय वाढले? (रक्कम कोटीत)
क्षेत्र / मागील तरतूद / यंदाची तरतूद
भारतीय क्रीडा प्राधिकरण / 500 / 660.41
राष्ट्रीय क्रीडा संघटना / 245 / 280
वाडा / 2 / 2.50
काय कमी झाले? (रक्कम कोटीत)
निकष / मागील तरतूद / यंदाची तरतूद
खेलो इंडिया / 890.42 / 657.71
खेळाडूंचा भत्ता / 70 / 53
राष्ट्रकुल स्टेडियम नुतनीकरण निधी / 75 / 30









