पुणे / प्रतिनिधी :
केंद्रीय अर्थसंकल्पाआधीच्या बैठकांना अर्थमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येत नसेल, तर हा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांचा नव्हे; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वतःचाच असेल. अर्थमंत्री फक्त बजेटमील मुद्दे वाचणार असतील, तर पंतप्रधानांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राजीनामा घेऊन नवीन अर्थमंत्री नेमावेत, अशी उपहासात्मक मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. अर्थव्यवस्थेबाबत आत्ताच उपाययोजना न केल्यास त्याचे अनिष्ट परिणाम होण्याची भीतीही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
याबाबत चव्हाण म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत असून, विकासदरदेखील कमी झाला आहे. सध्याचा विकासदर हा 4.5 टक्के असून, पुढील तिमाहीचा विकासदर हा 4.8 टक्केच असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर करण्याचे भाकित केले होते. परंतु, आज ती केवळ 2.7 ट्रिलीयन डॉलर इतकी आहे. तसेच आपले दरडोई उत्पन्न अमेरिका, सिंगापूर आणि चीन यांसारख्या अनेक राष्ट्रांच्या तुलनेत खूपच कमी आहे.









