डिझाईनर नाईक आत्महत्याप्रकरणी कारवाई
प्रतिनिधी / मुंबई
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तसेच टीआरपी घोटाळ्य़ामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी त्यांच्या घरातून इंटेरियर डिझाईनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी
अलिबाग पोलिसांनी अटक केली. इंटेरियर डिझाईनर अन्वय नाईक यांच्या मफत्यूला जबाबदार ठरल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र कारवाईदरम्यान, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. त्यानंतर अर्णब यांना अलिबाग न्यायालयात हलविण्यात आले. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून भाजप आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे.
अन्वय नाईक यांनी रिपब्लिक चॅनेलच्या स्टुडिओच्या डिझाईनचे काम केले होते.
त्यासाठी अर्णब यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईनेसुद्धा आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिले होते. याप्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी 306 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी अर्णब यांना वरळी येथील घरातून ताब्यात घेतले.
कारवाईला उशीर का?
अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिने मे महिन्यात गफहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केलेली नाही, अशी तक्रार तिने केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्याने सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटीस पाठवली होती. मात्र, मी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी थेट कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने कांदिवलीहून फिरोझ शेख आणि जोगेश्वरी येथून नीतेश सारडा यांनाही अटक केली आहे.
नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेत अर्णब यांच्यावरील अटकेच्या कारवाईचे स्वागत केले. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट नव्हती, मात्र, माझ्या वडिलांनी मफत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामीसह तिघांची नावे होती. तरीही आतापर्यंत कारवाई झाली नव्हती, असे नाईक यांच्या मुलीने सांगितले आहे.
माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव असूनही कारवाई का केली नव्हती, असा सवाल मुलगी आज्ञाने उपस्थित केला. अर्णब यांच्यामुळेच मागील सरकारने हे प्रकरण दाबले असा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला. या प्रकरणाचे तत्कालिन तपास अधिकारी वऱहाडे यांनी हे प्रकरण मागे घेण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला असा गंभीर आरोप करतानाच, आम्हाला मराठी वाचता येत नाही, असा समज करून त्यांनी चुकीच्या कागदपत्रांवर सही करून घेण्याचा प्रयत्न केला, असेही नाईक कुटुंबीयांनी सांगितले. ही तक्रार मागे घेण्यासंदर्भातील ते कागदपत्र होते. शिवाय आम्ही सूडबुद्धीने तक्रार दाखल केली आहे, असा उल्लेख त्यात केला होता. मात्र, आम्ही त्यावर आवाज उठवला, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात आम्ही तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचीही भेट घेतली होती. तसेच रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याही अनेकदा भेटी घेतल्या. तपास सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात आले. पण त्यात कुठलीही प्रगती झाली नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
- पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णबचा आरोप
- अर्णबमुळे तत्कालीन सरकारने प्रकरण दडपले; नाईक कुटुंबीयांचा आरोप
- राज्य सरकार-भाजपमध्ये जुंपली
शिवसेना-काँग्रेसकडून आणीबाणी मानसिकतेचे प्रदर्शन : देवेंद्र फडणवीस
आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता आजही कायम आहे. आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.









