कै. रत्नाकर शेट्टी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कै. रत्नाकर शेट्टी स्पोर्टस् फौंडेशन आयोजित के. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात अर्जुन स्पोर्टस् हुबळी टायगर्स संघाने लॉयगर संघाचा 7 गडय़ांनी पराभव करून क्वॉलिफायर फेरीत प्रवेश केला आहे. वसंत शहापूरकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
अर्जुन स्पोर्टस् टायगर्स, झेवर गॅलरी संघ क्वॉलिफायर फेरीत तर साईराज वॉरियर्स व डी. के. लॉयन्स संघ एलिमिनेटर फेरीत प्रवेश केला
आहे.
युनियन जिमखाना मैदानावर शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लॉयगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 89 धावा केल्या. वासीम धामणेकरने 1 षटकार 2 चौकारासह 19, ज्ञानेश होनगेकरने 13, अखिलेश वेर्णेकरने नाबाद 12 धावा केल्या. अर्जुन स्पोर्टस्तर्फे वसंत शहापूरकर 25 धावात 3, झिनत मुडगबागिल 13 धावात 2, मुघसर नाझीरने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल अर्जुन स्पोर्टस हुबळी टायगर्स 9.1 षटकात 3 गडीबाद 91 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. स्वप्नील मुळवेने 1 षटकार व 3 चौकारासह 34, मिलिंद चव्हाण 18, केदार उसुलकरने 3 चौकारासह नाबाद 15 धावा केल्या. लॉयगर तर्फे तुषार चौगुले, कैसर खाझर, अनंत माळवी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सुरेश पाटील, उबेद्दुल्ला खान, प्रसन्ना शेट्टी, स्वप्नील बन्नोशी, प्रणव शेट्टी, पुणीत शेट्टी यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल वसंत शहापूरकर, सर्वाधिक षटकार ज्ञानेश होनगेकर, इम्पॅक्ट खेळाडू मुदसर नझीर, सामनावीर वसंत शहापूरकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
आजचा पहिला सामना
1) क्वॉलिफायर : अर्जुन स्पोर्टस् हुबळी टायगर्स वि. झेवर गॅलरी यांच्यात सकाळी 9 वाजता
2) साईराज वॉरियर्स वि. डी. के. लॉयन्स एलिमिनेटर सामना दुपारी 1.30 वाजता









