ऑनलाईन टीम / नागपूर :
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला 28 दिवसांच्या फरलोवर तुरुंगाबाहेर सोडण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला फरलो मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत गवळीच्या मुलीचे लग्न पार पडले. त्या लग्नासाठी गवळी पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला होता. त्यापूर्वी पत्नीच्या आजारपणासाठीही त्यांनी 45 दिवस पॅरोल रजा घेतली होती. लॉकडाऊनमुळे 24 मे पर्यंत त्याच्या पॅरोलमध्ये वाढ झाली. त्यानंतर तो नागपूर कारागृहात हजर झाला.
त्यानंतर गवळीला पुन्हा फरलो मंजूर झाला आहे. त्यासाठी त्याने 30 नोव्हेंबर 2019 मध्ये तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी गवळीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आतापर्यंत 8 वेळा गवळी पॅरोलवर तुरुंगाबाहेर आले. तेव्हा त्यांनी कोणत्याही नियमांचा भंग केला नाही. वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने गवळीला 28 दिवसांचा फरलो मंजूर केला.