क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
ओडिशा एफसीला काल आएसएल फुटबॉल स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात त्याना हैदराबाद एफसीने एकमेव गोलने पराभूत केले. सामन्यातील विजयी गोल 34व्या मिनिटाला हैदराबाद एफसीचा कप्तान अरीदाने जिझस सांतानाने पेनल्टीवर केला. या विजयाने हैदराबादला 3 गुण प्राप्त झाले.
सामन्याच्या पहिल्या सत्रातील खेळावर निर्विवादपणे हैदराबाद एफसीचे वर्चस्व आढळून आले. मिळालेल्या संधींचा अचुक उपयोग केला असता, तर हैदराबाद एफसीला पहिल्या सत्रातच एक भक्कम आघाडी मिळाली असती. हैदराबादच्या मध्यफळीतील खेळाडूंनी काल चांगला खेळ केला.
सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला हैदराबाद एफसीला आघाडी करण्याची नामी संधी होती. यावेळी यावेळी लुईस सास्त्रsने केलेल्या क्रॉसवर कप्तान अरीदाने जिझस सांतानाने हाणलेला हेडर गोलमध्ये जाता जाता किंचित हुकला. नियमित आक्रमणे करून हैदराबादने ओडिशा एफसीवर वारंवार दबाव कायम ठेवण्यात यश मिळविले. 12व्या मिनिटाला निखिल पुजारीने चेंडूवर नियंत्रण ठेऊन प्रतिस्पर्ध्यांच्या दोन बचावपटूंनाही गुंगारा दिला होता, मात्र मोक्याच्या क्षणी तो गोल करण्यात अपयशी ठरला.
हैदराबाद एफसीने सामन्याच्या 34व्या मिनिटाला गोल नोंदविला. हालीचरण नर्झारीने डी कक्षेतून हाणलेला जमिनीलगतचा फटका परताविताना बचावपटू आणि कप्तान स्टीव्हन टेलरच्या हाताला लागला. यावेळी रेफ्री तेजस नागवेकरने हैदराबादला पेनल्टी फटका बहाल केला. या सुवर्णसंधीचा फायदा घेत कप्तान अरीदाने सांतानाने प्रतिस्पर्धी गोलरक्षक अर्शदीप सिंगला भेदले आणि चेंडू जाळीत टोलविला.
मध्यंतराला दोन मिनिटे शिल्लक असताना ओडिशा एफसीने सामन्यातील आपली पहिली धोकादायक चाल रचली. यावेळी मान्यूयल ओन्वूने दोन डिफेंडर्सला चकविले, मात्र त्याचा फटका सहज गोलरक्षक सुब्रतो पॉलच्या हातात गेला.
मध्यंतराच्या ठोक्याला अर्शदीपने अरीदानेचा गोल करण्याचा यत्न आपल्या उजव्या बाजूने डाईव्ह मारून कॉर्नरसाठी टाकला.
दुसऱया सत्रात ओडिशा एफसीला गोल बाद करण्याची संधी मिळाली होती. 58व्या मिनिटाला डायगो मॉवरीसच्या पासवर मान्यूयल ऑन्वूने कमजोर फटका सरळ गोलरक्षक सुब्रतो पॉलच्या हातात मारला. हैदराबादने 62व्या मिनिटाला बदल करताना मोहम्मद यासीरच्या स्थानावर गोव्याच्या रिस्टन कुलासोला संधी दिली. त्यानंतर त्याने पाचच मिनिटानी आपलं कसब दाखविले. लिस्टनने डाव्या बगलेत मिळालेल्या पासवर ओडिशाच्या बचावफळीला खिंडार पाडले, मात्र त्यांचा फटका गोलमध्ये जात असताना किंचित बाजूने गेला.
रिस्टन कुलासाने काल सुरेख खेळ केला आणि आपलं लक्ष वेधून घेतले. चेंडूवर असलेले त्याचे नियंत्रण तर वाखाणण्याजोगे होते. तीन वेळा आपल्या वेगवान खेळाने त्याने ओडिशाच्या बचावफळीला भेदले, मात्र मोक्याच्या क्षणी त्याचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले.