19 मे रोजी संघटनेची शिखर परिषद
वृत्तसंस्था/ कैरो
अरब देशांच्या प्रतिनिधींनी रविवारी इजिप्तची राजधानी कैरो येथे मतदान करून 12 वर्षांनी सीरियाला अरब लीगमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. क्षेत्रातील वरिष्ठ राजनयिकांनी अलिकडेच जॉर्डनमध्ये सीरियाला अरब लीगमध्ये पुन्हा सामील करण्याच्या रोडमॅपवर चर्चा केली होती. सौदी अरेबिया 19 मे रोजी आगामी अरब लीग शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
12 वर्षांपूर्वी बंड संघर्षात रुपांतरित झाल्यावर सीरियाचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले होते. मार्च 2011 पासून संघर्षात सुमारे 5 लाख मारले गेले आहेत. तर युद्धापूर्वीच्या देशाच्या 2.3 कोटी लोकसंख्येचा निम्मा हिस्सा विस्थापित झाला आहे.
अरब लीगसंबंधीच्या मतदानात भाग घेणाऱ्या 22 सदस्य देशांपैकी 13 सदस्यांनी निर्णयाचे समर्थन पेले आहे. अरब लीगमध्ये सर्वसाधारपणे सर्वसहमतीने करारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु कधीकधी बहुमताने निर्णय घेतला जात असतो.
सीरियासोबत संबंध प्रस्थापित करण्यावरून सर्व अरब देशांमध्ये अद्याप सहमती नाही. मतदानात अनेक देशांच्या सरकारांनी भाग घेतला नाही. यात कतारचा देखील समावेश आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सरकारच्या विरोधातील गटांना कतारचे समर्थन आहे. सीरियासोबत संबंध प्रस्थापित करण्यास कतारचा विरोध आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव 2254 च्या अनुरुप संकटावर राजनयिक तोडग्यापर्यंत पोहोचण्यासाठी अरब सरकारांसोबत जारी संवादाच्या अंतर्गत सीरियाला सदस्यत्व प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात अरब लीगने सौदी अरेबिया, सीरियाचे शेजारी लेबनॉन, जॉर्डन आणि इराकला मिळून एक समिती स्थापन केली आहे.









