ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संयुक्त अरब अमिरातीने ‘मिशन अमन’ ही मोहीम आखली आहे. त्यानुसार अरब देशांच्या पहिल्या मंगळ मोहिमेला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. जपानच्या तन्नेगाशिमा बेटावरून 14 जुलैला या उपग्रहाचे उड्डाण होईल. मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक ओमरन शराफ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ओमरन शराफ म्हणाले, मंगळावरील माहिती संकलित करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे. अरब देश 2014 पासून या प्रकल्पावर काम करत आहेत. जपानी तंत्रज्ञानाद्वारे मंगळाच्या वातावरणाच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागाविषयी माहिती गोळा करणे, हे या मिशनचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन पातळी देखील मोजेल, जेणेकरुन मंगळावरील पाण्याच्या पातळीचे मूल्यांकन करता येईल. विशेष म्हणजे सौदी अरेबियाचा राजकुमार, सुलतान बिन सलमान अल सऊद हा 1985 मध्ये अमेरिकेच्या शटलवर चढणारा पहिला अरब अंतराळवीर होता.फेब्रुवारीत हा उपग्रह मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल.
ग्रहानजीकच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर, ग्रहावरील ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायूंची पातळी मोजण्यासाठी अल्ट्राव्हायलेट स्पेक्ट्रोमीटर, बॅटरी चार्ज करण्यासाठी ६०० वॉटची सोलार पॅनेल अशी या मोहिमेची वैशिष्ट्ये असतील. या उपग्रहाचा प्रवास ४९३ दशलक्ष किमीचा आहे. यासाठी 7 महिने काळ लागणार आहे. हा उपग्रह 687 दिवस मंगळाभोवती फिरणार आहे. मंगळाला प्रदक्षिणा मारण्यास या उपग्रहाला 55 तासांचा वेळ लागेल.1350 किलो या उपग्रहाचे वजन आहे.