करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या भावना ः भूमीपूजन सोहळा समस्त भारतवासियांसाठी अलौकीक पर्वणी
कोल्हापूर ः फोटो ः 3संग्राम फोल्डरमध्ये (शंकराचार्य विद्यानृसिंह भारती)
कोल्हापूर / संग्राम काटकर
अयोध्येत येत्या बुधवारी (दि. 5) केले जाणारे राममंदिराचे भूमीपुजन ही भारतवासियांसाठी एक अलौकीक पर्वणी असणार आहे. याचबरोबर गेली तीन दशकांहून अधिक काळ मंदिर उभारणीसाठी रामभक्तांनी घेतलेल्या अविरत परिश्रमाचे चीज होणार आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी एकत्रित केलेली कार सेवा, वीजपूजा, भागवत व राममंत्र आदी धार्मिक कार्य अगदी मनापासून झाले. या सगळ्याचे फळ म्हणून राममंदिर अस्तित्वात येत आहे. भविष्यात हे मंदिर भारतवासियांचे नव्हेत संपूर्ण विश्वाचा मानबिंदू ठरेल, असा मला विश्वास आहे, अशी भावना श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ, करवीरचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी ‘तरुण भारत’शी साधलेल्या संवादात व्यक्त केली.
गेल्या तीनदशकांहून अधिक काळ न्यायालयातील वाद कायमचा सुटल्यानंतर राममंदिराची उभारणी कधी होणार? याची चर्चा साऱया भारतभर सुरु झाली होती. विरोधकही ‘राममंदिर बनायेंगे लेकीन, तारीख नही बतायेंगे’ अशा शब्दात केंद्र सरकारची खिल्ली उडवत होते. अखेर सरकारने रामंदिराच्या भूमीपुजनाच्या सोहळ्याची तारीख जाहीर करुन टिकाटिप्पणीसह राममंदिर उभारणीच्या कार्याच्या चर्चेला कायमचा पूर्णविराम दिला. मंदिराचा आराखडा पूर्वीपासून तयार असल्याने पायाभरणीचा सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे या सोहळ्यावर मर्यादा आल्या. पण तरी निमंत्रित केल्या जाणाऱया महनिय व्यक्तींच्या उपस्थितीत बुधवारी रामंदिर भूमीपुजनाचा सोहळा होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना मांडल्या. ते म्हणाले, दीर्घ संघर्षानंतर अयोध्येत राममंदिर उभारत असल्याचा आनंद साऱया जगभरात पसरत चालला आहे. लोकही साकारल्या जाणाऱया मंदिराकडे श्रद्धास्थान म्हणूनच पाहत आहेत. प्रभू श्रीराम हे अखंड विश्वाचे स्वामी आहेत. त्यांचे मंदिरही विश्वाचा मानबिंदूच बनेल. प्रभू श्रीराम यांनी परिस्थिती प्रतिकूल असो अथवा अनुकूल असो मनाची स्थितीची कधीच बदलू दिली नाही. सर्वाना न्याय हे त्यांनी जीवनातील आपले महत्वपूर्ण कार्य मानले होते.
शंकराचार्य विद्यानृसिंह भारती म्हणाले, समस्त मानवजातीनेही जीवन जगत असताना प्रभू श्रीराम यांच्याप्रमाणे मनाची स्थिती बदलणार नाही याची पदोपदी जाणिव ठेवावी. मनाची स्थिती बदलू न देणे मोठे कठिण असते. मात्र प्रयत्न केल्यास कठिणता गळून पडेल. आपला देह शुद्धचरणाने मंदिर बनवून त्यात आत्माराम हृदयसिंहासनावर बसविल्यास मनाची स्थिती कधीच बदलणार नाही. याची सुरुवात सर्वांनी राममंदिर भूमीपुजनाच्या अद्वितीय योगावर करावी. याचबरोबरच राममंदिराच्या भूमीपुजनाच्या मंगलप्रसंगी प्रत्येकाने एक प्रतिज्ञा करायला हवी. ती अशी की मी इथून पुढे माझे संपूर्ण आयुष्यच धर्मनिष्ठेने जगेन. असे केल्याने पीठस्थ देवतांचे अनेक आशिर्वाद लाभतील, असे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी सांगितले.
————-








