डोनाल्ड ट्रम्प शपथविधी सोहळय़ाला राहणार गैरहजर
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
20 जानेवारी रोजी अमेरिकेला नवा अध्यक्ष मिळणार आहे. जोसेफ आर. बायडेन ज्युनियर म्हणजेच जो बायडेन बुधवारी दुपारी 12 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता) 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळय़ाच्या दिवसाला इनॉगरेशन डे म्हटले जाते. यंदा होणाऱया या सोहळय़ात अनेक गोष्टी बदललेल्या दिसून येणार आहेत. कोरोना महामारी तसेच 7 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेत तसेच बाहेर झालेल्या हिंसाचारामुळे अनेक बदल करण्यात येणार आहेत.
सरन्यायाधीश जॉन जी रॉबर्ट ज्युनियर कॅपिटॉल हिल्सच्या वेस्ट प्रंटवर बायडेन यांना अध्यक्षपदाची शपथ देणार आहेत. त्यानंतर अध्यक्ष बायडेन ‘इनॉगरल स्पीच’ देतील. यात अमेरिकेच्या मतदारांचे आभार मानले जाणार आहेत. गायिका गागा अमेरिकेचे राष्ट्रगीत म्हणणार असून सोहळय़ात जेनिफर लोपेझचा सांगितिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस ‘प्रेसिडेंट एस्कॉर्ट’मधून कॅपिटॉल हिलपासून व्हाइट हाउसमध्ये जातील. सर्वसाधारपणे सुमारे 3 लाख लोक रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे राहून हा सोहळा अनुभवतात. परंतु यंदा असे घडणार नाही.
कोरोना संकट पाहता इनॉगरल कमिटीची देशभरात आभासी संचलनाचे आयोजन करण्याची योजना आहे. या आभासी संचलनांमध्ये संगीत असणार आहे. यात कवी आणि नृत्यांगना महामारीच्या प्रंटलाइन नायकांच्या सन्मानार्थ कला सादर करणार आहेत.
इनॉगरेशन सेरेमनीत सामील होणार नसल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळय़ात सामील होणार आहेत. बायडेन यांनी पेन्स यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीन अध्यक्ष स्वतःच्या उत्तराधिकाऱयाच्या शपथविधी सोहळय़ात सामील झालेले नाहीत. 1801 मध्ये जॉन ऍडम्स, 1829 मध्ये त्यांचे पुत्र जॉन्स क्वींसी ऍडम्स आणि 1869 मध्ये ऍन्ड्रय़ू जॉन्सन सामील झाले नव्हते.
माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश आणि त्यांच्या पत्नी लॉरा या सोहळय़ात सामील होणार आहेत. बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल, बिल क्लिंटन आणि त्यांच्या पत्नी हिलरीही सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 96 वर्षीय सर्वात वृद्ध हयात माजी अध्यक्ष जिमी कार्टर आणि त्यांच्या पत्नी मात्र सोहळय़ात उपस्थित राहणार नाहीत.
इनॉगरेशन सेरेमनीत लाखो लोक सामील होतात. दरवेळेप्रमाणे यंदाही जॉइंट काँग्रेस कमिटी सोहळय़ाची तिकीटे वितरित करत आहे. परंतु ही तिकीटे केवळ काँग्रेसचे सदस्य आणि अन्य पक्षाच्या सदस्यांसाठी आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्यांना यंदा तिकीट मिळणार नाही. कमिटीने लोकांना घरात राहून आभासी सोहळय़ात सामील होण्याचे आवाहन केले आहे.









