वृद्ध आईचा होता नव्हता आधारही गेला
प्रतिनिधी /राय
मूळ खुरसाभाट -चांदर येथील आणि सध्या नोकरीनिमित्त हौस्टन-टेक्सास (अमेरिका) येथे गेलेल्या जॉन डायस या 20 वर्षीय युवकाचा गोळी झाडून खून करण्यात आला. ही घटना रविवारी पहाटे अमेरिकेत घडली. या प्रकाराची खबर सोमवारी पहाटे चांदर गावात कळताच गावात एकच शोककळा पसरली.
प्राप्त माहितनुसार जॉन डायस हा हौस्टन येथील होमस्ट्रड रोडवरील व्ही. स्टॉप फूड मार्ट येथे कारकून म्हणून नोकरीला होता. काऊंटरवर आलेल्या एका ग्राहकाने अकस्मात पिस्तूल काढून जॉन डायस याच्यावर गोळी झाडली. ही गोळी डायस यांच्या उजव्या खांद्याला लागली आणि डायस खाली कोसळले अशी माहिती तेथील (हौस्टन येथील ) पोलीस अधिकारी क्रीस पेर्साद यांनी तेथील वर्तमानपत्राला माहिती देताना सांगितले. मात्र, या खुनाचे कारण लगेचच कळू शकलेले नाही.
या गोळीबारानंतर व्ही. स्टॉप फूड मार्टमधील इतर कर्मचारी लगेचच आस्थापनाबाहेर आले. शापोरा शार्क नावाची एक महिला या फूड मार्टमध्ये ग्राहक या नात्याने नेहमी सामान खरेदी करायला जायची. या घटनेने आपल्याला धक्काच बसला. या फूड मार्टच्या जवळील परिसरातच आपण वाढली. जॉन डायस हा आपल्याला एका कुटूंबातील सदस्यासारखाच होता. या घटनेने आपल्याला अतिव दुःख झालेले असल्याचे तिने सांगितल्याचे हॉस्टन येथील प्रसार माध्यमाने म्हटलेले आहे.
चांदर गावचे सरपंच एडवर्ड निकलास डिसिल्वा यांनी या संबंधी माहिती ‘ तरुण भारत’ देताना सांगितले की ‘जॉन डायस हा परिस्थितीने अत्यंत गरीब मुलगा होता. एक खोली असलेल्या एका भाडय़ाच्या खोलीत तो आणि त्याची आई राहात होती. जॉन याना अमेरिकेत नोकरी लागलेली ऐकून गावात समाधान होते, मात्र ताजी घटना ऐकून संपूर्ण गावावरच शोककळा पसरलेली आहे. या घटनेची तेथील पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषीला कडक शिक्षा करावी त्याचप्रमाणे गोवा सरकारनेही या प्रकरणाचा पाठपुरावा करावा’ अशी विनंती त्यांनी केली. मयत जॉन डायस याच्या मागे त्याची एक वृद्ध आई आहे. तिचा होता नव्हता आधारही गेला अशीही प्रतिक्रिया चांदर गावच्या या सरपंचाने व्यक्त केली.
जॉन डायस याचा मृतदेह गोव्यात कधी येणार हे लगेचच सांगता येणार नसल्याचे सरपंच डिसिल्वा यांनी सांंिगतले.
चांदरचे एक पंच डॅरीक ब्रागांझा पैरैरा यांनीही जॉन डायस यांच्या निधनावर दुःख व्यक्त करुन पुरा चांदर गावाला या घटनेने दुःख झाले असल्याचे सांगितले.









