भारतीय वंशाचा एक कर्मचारी जखमी- हल्लेखोराने स्वतःचे जीवन संपविले
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या इंडियाना प्रांतात ‘फेडएक्स’ कंपनीच्या एका परिसरात झालेल्या गोळीबारात शीख समुदायाच्या 4 जणांसह किमान 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन शीख महिला सामील आहेत. या घटनेने हादरलेल्या शीख समुदायाच्या लोकांनी वंशद्वेषाने प्रेरित गुन्हे आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आवाहन केले आहे.
इंडियानाच्या 19 वर्षीय ब्रेंडन स्कॉट होल याने गोळीबार करत अनेकांचे जीव घेतले आहेत. इंडियानापोलिसमधील फेडएक्स कंपनीच्या परिसरात गुरुवारी रात्री उशिरा गोळीबार केल्यावर कथितरित्या त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. 2020 मध्ये बेंडन हा फेडएक्सचा कर्मचारी होता.
मागील वर्षी ब्रेंडन यांच्या आईने एफबीआयला फोन करून तो आत्मघाती पाऊल उचलू शकतो असे कळविले होते. त्यानंतर एफबीआयने त्याची चौकशी केली होती. डिलिव्हरी सेवा प्रदाता कंपनीच्या या परिसरात कार्यरत 90 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असून यातही बहुतांश शीख समुदायाशी संबंधित आहेत.
शीख समुदायाचे नेते गुरिंदर सिंह खालसा यांनी फेडएक्सच्या कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. या घटनेमुळे शीख समुदाय व्यथित असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
मारियन काउंटी कोरोनर कार्यालय आणि इंडियानापोलीस मेट्रोपोलिटन पोलीस विभागाने (आयएमपीडी) शुक्रवारी रात्री उशिरा मृतांची नावे जाहीर केली आहेत. मृतांमध्ये अमरजीत जोहल (66 वर्षे), जसविंदर कौर (64 वर्षे), अमरजीत (48 वर्षे) आणि जसविंदर सिंग (68 वर्षे) सामील आहे. अन्य मृतांमध्ये कार्ली स्मिथ, एलक्जेंडर मॅट, समारिया ब्लॅकवेल आणि जॉन व्हाईट यांचा समावेश आहे. तर हरप्रीत सिंग गिल (45 वर्षे) हे गोळीबारात जखमी झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. होमलँड सिक्युरिटीच्या पथकाने मला आणि उपाध्यक्षा हॅरिस यांना इंडियानापोलीसमध्ये फेडएक्स परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती दिल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या दौऱयावर असलेले जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी व्हाइट हाऊसमधील बैठकीच्या प्रारंभी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. निर्दोष नागरिकांसोबत हिंसा होऊ नये. स्वातंत्र्य, लोकशाही, मानवाधिकार आणि कायद्याचे राज्य ही जागतिक मूल्ये आम्हाला जोडतात आणि ती हिंद-प्रशांत क्षेत्रात कायम असल्याचे सुगा यांनी म्हटले आहे.
बायडेन यांनी मृतांच्या सन्मानार्थ व्हाइट हाऊस तसेच अन्य संघीय इमारतींमध्ये राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणण्याचा आदेश दिला आहे. तर अमेरिकेतील भारतीय दूतावासाने या घटनेत मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. शिकागो येथील भारतीय महावाणिज्यदूत अमित कुमार यांनी इंडियानापोलीसचे महापौर जो होगसेट यांच्याशी चर्चा करत शक्य ती सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.








