भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याच्या काही दिवस अगोदरच म्हणजे 19 मार्च रोजी आम्ही सहकुटुंब अमेरिकेत पदार्पण केले. पुणे येथील आमच्या घरातून निघण्याअगोदरच आम्ही सर्व जगभरातून कोव्हिड 19 च्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमातून ऐकत होतोच. भारतामध्येही कोव्हिड 19 चा शिरकाव व्हायला सुरुवात झाली होतीच. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली इत्यादी राज्यामध्ये थोडय़ाफार प्रमाणात शिरकाव झाला होताच. या पार्श्वभूमीवर आमचे एअर इंडियाचे तिकीट अगोदरच आरक्षित केलेले असल्याने विमानसेवा कधीही बंद होतील या धास्तीने अमेरिकेला येण्याचा निर्णय घेतला.
सर्व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमातून व अमेरिकेमधील आमचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्याकडून सावधानतेचे अनेक डोस मिळतच हेते. मनामध्ये धाकधूक होतीच पुढे काय होईल आणि सुखरूपपणे पोचू की नाही याची.
आम्ही निघण्याच्या वेळेस पुण्यात मास्क, सॅनिटायझर मिळणेही कठीण झाले होते. पण आंतरराष्ट्रीय प्रवास करावयाचा असल्याने कसेबसे इकडून तिकडून मास्क व सॅनिटायझर मिळविले. सायंकाळी पाचच्या सुमारास टॅक्सी करून आम्ही 9 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. अपेक्षेप्रमाणे प्रत्येकजण नाकावर मास्क लावूनच फिरत होते. नेहमी प्रवाशांनी गजबजलेले विमानतळ तुलनेने मोकळे मोकळे वाटत होते. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासांचे सोपस्कार म्हणजे बोर्डिंग पास, सेक्मयुरिटी, इमिग्रेशन इत्यादी पूर्ण झाल्यावर रात्री 1.30 वाजता निघणाऱया आमच्या विमानाची वाट पहात बसलो.
विमानतळावर खूपच गंभीर वातावरण होते. सर्व प्रवासी एकमेकापासून दूर राहून व्यवहार करीत होते. एक प्रकारचे संशयाचे, भीतीचे वातावरण सर्वत्र पहायला मिळत होते. विमान वेळेवर निघणार होते. नेहमी सर्वप्रथम विमानात प्रवेश करण्यासाठी गडबड करणारे भारतीय प्रवासीही आज अतिशय गंभीरपणे एकमेकांमध्ये अंतर ठेवून कुणी आजुबाजूला शिंकत नाही ना, खोकत नाही ना, याची काळजी घेत विमानात प्रवेश करत होते. निश्चितच प्रवाशांच्या मनामध्ये भीती, चिंता, संशय व अनिश्चिततेचे वातावरण दिसत होते.
एअर इंडियाच्या विमानाचा आजचा प्रवास मुंबई ते नेवॉर्क असा 16 तासाचा थेट प्रवास होता. इतर सर्व विमाने मिडल ईस्ट अथवा युरोपमधून जात असल्याने कोव्हिड 19 संसर्गिकरण होऊ नये म्हणून अगोदरच स्थगित करण्यात आली होती.
प्रवासाच्या शेवटी आम्हा प्रत्येक प्रवाशांना एक मेडिकल डिक्लरेशन फॉर्म देण्यात आला. त्यामध्ये कुठल्या देशातून कोणत्या विमानाने आपण प्रवास करीत आहोत याची माहिती देणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला, ताप, घशामध्ये खवखवणे, इत्यादी लक्षणे असल्यास त्याचाही उल्लेख करणे बंधनकारक होते. त्याच फॉर्ममध्ये खालील एका चौकोनात डॉक्टरच्या परीक्षणाचा रकाना होता. त्यावरून असे वाटत होते की विमानातून उतरल्यावर आमची वैद्यकीय तपासणी होणार. त्याबद्दल प्रवाशांना कल्पनाही दिली होती. सुदैवाने आम्ही भारतातून थेट फ्लाईटने येत असल्याने कोणतीही वैद्यकीय परीक्षा द्यावी लागली नाही. अमेरिकेत पदार्पण झाल्यावर आमचे नातेवाईक आम्हाला घेऊन जाण्यास आले होते. नुकताच थंडीचा मोसम संपत आला असल्याने झाडांना अजून पालवी फुटली नव्हती. एक गोष्ट मात्र ताबडतोब लक्षात आली की भारत अमेरिका यातील अंतर जवळजवळ 10 हजार मैल असले तरी एवढय़ा लांब असूनसुद्धा कोव्हिड 19चा अदृश्य जिवाणू इथेही भारताएवढा नव्हे तर थोडा जास्तच धुमाकूळ घालत होता.
आम्ही आलो त्याच्या अगोदरच्या आठवडय़ापासूनच कोव्हिड 19चा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली होती. चीन, जर्मनी, इटली, अरब राष्ट्रे व इतर देशातून येणाऱया प्रवाशांकडून हा संसर्ग पसरत होता. परिणाम म्हणून अमेरिकेने या सर्व देशांचा वाहतूक संबंध स्थगित केला. शासनाकडून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. अमेरिकेत लॉकडाऊनला सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले. नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले. आज अमेरिकेत अतिशय भीतीचे, चिंतेचे आणि अनिश्चिततेचे सावट आहे. आर्थिकदृष्टय़ा प्रबळ, वैद्यकीय क्षेत्रात पुढारलेला उत्तम शासन व्यवस्था असलेला श्रीमंत देश म्हणून जगात ख्याती असलेला अमेरिका आज कोव्हिड 19च्या अदृश्य किटाणूसमोर अक्षरशः लोटांगण घालतो आहे.
आजमितीला चढत्या दराने या रोगाची नागरिकांना लागण होते आहे. आम्ही इथे आल्यापासून केवळ 15 दिवसात दोन लाखापेक्षा जास्त लोकांना या रोगाची लागण झाली आहे. 5,500 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अजूनही कुठले औषधही दृष्टीपथात नाही. येथील वैद्यकीय वैज्ञानिकांनी सुद्धा या रोगासमोर हात टेकले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रतिबंधक लसीचा शोध लागण्यास कमीत कमी 1 वर्ष जाईल. तोपर्यंत व्हिंटीलेटर हाच एक उपाय आहे. पण त्याचीही काही निश्चिती नाही. भरीस भर म्हणून व्हिंटीलेटरचाही तुटवडा भासत आहे. न्यूयॉर्क शहरात सर्वात जास्त लागण झालेले रुग्ण असून मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्याही सर्वात जास्त आहे. त्या खालोखाल कॅलिफोनिया, लुझियांना, फ्लोरिडा या राज्यामध्ये चढत्या दराने रोग पसरत आहे आणि आता शहरी भागातून ग्रामीण भागात संसर्ग पसरण्यात सुरुवात झाली आहे.
डॉक्टर व नर्सेस अहोरात्र एक एक जीव वाचविण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहेत. अशा सेवा करणाऱया डॉक्टर व नर्सेनाही बऱयाच मोठय़ा प्रमाणात लागण झाली असून काही डॉक्टर्स व नर्सेसचाही मृत्यू झालेला आहे. मैदाने, सांस्कृतिक हॉल, मोठे रस्ते सर्व ठिकाणी दररोज येणाऱया रुग्णांना उपचारासाठी हजारो बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. इतकी सर्व व्यवस्था असूनही दररोज हजारोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत.
दोनच दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सर्व व्यवहार एक महिन्यासाठी बंद करण्याचे आवाहन केले आहे. सर्व नागरिकांसाठी अनेक नियमांचे पालन करण्यासाठी आज्ञा दिल्या आहेत. आज 90 टक्के पेक्षा जास्त नागरिक घरातच बंद आहेत. परिस्थिती इतकी भयानक आहे की घरात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या घरातील जास्तीत जास्त पाच नातेवाईकच उपस्थित राहू शकतात, तेही नियमात राहूनच. शेकडो मृतदेह तर शवागरात पडून आहेत. नातेवाईक आपल्याला रोगाची लागण होईल या भीतीने मृतदेहसुद्धा घेऊन जाण्यास पुढे येण्यास घाबरत आहेत. एकाच घरातील तीन-चार व्यक्तांचा मृत्यू एका आठवडय़ात होणे हे नित्याचेच झाले आहे. येणारा काळ यापेक्षाही कठीण असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरी येत्या एप्रिल महिन्यात लाखो लोकांना या रोगाची लागण होऊन 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व घटनामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली आहे. लाखो व्यवसाय बंद पडले आहेत. लाखो लोकांच्या नोकऱया गेल्या आहेत. या आठवडय़ात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा बेकारीमुळे 6.6 दशलक्ष लोकांच्या नोकऱया गेल्या आहेत. पण या सर्वांमये एकच गोष्ट वाखाणण्यासारखी आहे की सर्व नागरिकांसाठी सरकारने प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदत, वैद्यकीय उपचार, अन्नधान्य मोफत देण्याची व्यवस्था केली आहे.
एकंदरीत सर्वत्र भीतीचे वातावरण असून अशी अवस्था किती दिवस, किंवा किती महिने चालेल याची शाश्वता नाही. केवळ येणारा काळच याचे उत्तर देऊ शकेल. तोपर्यंत स्वतःची काळजी घेणे हाच एक उपाय आहे.
थेट अमेरिकेतून , वेंकटेश पतकी
(पूर्वार्ध)








