145 ठिकाणांवर लस पोहोचविण्याचे काम गतिमान : व्हाइट हाउसचा समावेश नाही
अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणास प्रारंभ झाला असून याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. देशाच्या अनेक प्रांतांमध्ये 145 ठिकाणांवर लस पोहोचविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु व्हाइट हाउसमध्ये अत्यावश्यक काम करणारे कर्मचारी आणि अधिकाऱयांना आताच लस मिळणार नाही. 10 दिवसांत या कर्मचारी आणि अधिकाऱयांना लस मिळणार असल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाल होते. परंतु अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वृत्त फेटाळून व्हाइट हाउसच्या कर्मचारी वर्गाला लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत पुढील टप्प्यात लस दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अत्यंत आवश्यकता भासली तरच संबंधितांना लस देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष माइक पेन्स यांनाही लस उपलब्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. परंतु ट्रम्प ही लस त्वरित टोचून घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, कारण यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनाही लस देण्याची योजना आहे.
अनेक टप्प्यांमध्ये लसीकरण
अमेरिकेत अनेक टप्प्यांमध्ये लसीकरण पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रंटलाइन आरोग्य कर्मचारी आणि देखभाल केंद्रांमध्ये राहत असलेल्या वृद्धांना लस देण्यात येणार आहे. कोरोना लसीच्या वितरणाची जबाबदारी जनरल गुस्ताव पेरना यांच्याकडे आहे. चालू आठवडय़ाच्या अखेरपर्यंत सर्व प्रांतांमध्ये लसीचे सुमारे 30 लाख डोस पोहोचविण्यात येणार आहेत. ट्रक्स आणि विमानांद्वारे लसीचे डोस पोहोचविण्यात येत असल्याची माहिती पेरना यांनी दिली आहे.
5 जणांसह शुभारंभ
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिस 5 जणांना लस टोचून लसीकरण कार्यक्रमाचा शुभांरभ करणार आहे. या सोहळय़ाला ‘किक ऑफ इवेंट’ नाव देण्यात आले आहे. या पाच जणांना वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिवर्सिटी हॉस्पिटलमध्ये लस टोचली जाणार आहे. हे सर्वजण आरोग्य कर्मचारी आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना लस देण्यात येणार आहे. नागरिकांना लस देण्यास चालू आठवडय़ातच प्रारंभ होणार आहे.
निम्म्या लोकसंख्येसाठी व्यवस्था
अमेरिकेने मॉडर्नाच्या लसीच्या 10 कोटी अतिरिक्त डोसची मागणी केली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात अमेरिकेने मॉडर्नाकडून 1 लाख डोस खरेदी केले होते. अमेरिकेने एकूण 30 कोटी अतिरिक्त डोस खरेदीचे लक्ष्य बाळगले आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोसची गरज भासणार आहे. या हिशेबाने 15 कोटी लोकांना प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यात येणार आहे.









