संतुलन बिघडल्याने विमानात चढताना पडले
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची एक चित्रफित समोर आली असून यात ते स्वतःचे विमान एअरफोर्स वनच्या पायऱयात चढताना 3 वेळा पडल्याचे दिसून येते. सुदैवाने त्यांना या सर्व प्रकारादरम्यान कुठलीच ईजा झालेली नाही. हा सर्व प्रकार शुक्रवारी घडला आहे.
यात बायडेन पायऱया चढताना अगोदर 2 वेळा लडखडले, पण तिसऱयावेळी ते गुडघ्यांवर पडले आहेत. यानंतर रेलिंग पकडून ते विमानात दाखल झाले आहेत. अटलांटा दौऱयावर जात असताना बायडेन यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. अटलांटामध्ये ते आशियाई-अमेरिकन समुदायायच नेत्यांना भेटणार होते. या घटनेनंतर त्यांच्या प्रकृतीसंबंधी चिंता वाढल्या आहेत. 78 वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वृद्ध अध्यक्ष आहेत.
अध्यक्ष बायडेन 100 टक्के तंदुरुस्त असल्याचे विधान व्हाइट हाउसचे माध्यम सचिव कॅरिन जीन-पियरे यांनी केले आहे. पायऱयांवर चुकीचे पाऊल पडण्याव्यतिरिक्त यात आणखीन काहीच घडलेले नाही. त्यावेळी वाराही जोरदार असल्याने त्यांचे संतुलन बिघडले असावे असे पियरे यांनी म्हटले आहे.
बायडेन यांचे वैयक्तिक फिजिशियन राहिलेले डॉ. केविन को’कॉनर यांनी डिसेंबर 2019 मध्ये त्यांच्या आरोग्यासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला होता. यानुसार बायडेन हे मद्य तसच तंबाखू आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचे सेवन करत नाहीत. त्यांनी मधूमेह तसेच उच्च रक्तदाबाचीही समस्या नाही. वर्कआउटची कसोशीने पालन करत त्यांनी स्वतःचे वजन 80 किलोपर्यंत राखले असल्याचे म्हटले गेले होते.