वृत्तसंस्था/ ग्वाडालाजरा (मेक्सिको)
रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील ऍबीर्टो झॅपोपॅन महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या स्लोअन स्टिफेन्सने एकेरीचे जेतेपद मिळविताना मेरी बुझकोव्हाचा पराभव केला. चार वर्षांच्या खंडानंतर स्टिफेन्सने डब्ल्यूटीए टूरवरील मिळविलेले हे पहिले व एकूण सातवे विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्टेफेन्सने झेक प्रजासत्ताकच्या बुझकोव्हाचा 7-5, 1-6, 6-2 असा पराभव केला. तब्बल चार वर्षांनंतर स्टिफेन्सचे हे पहिले विजेतेपद आहे. जागतिक टेनिसपटूंच्या मानांकन यादीत स्टिफेन्स 57 स्थानावर असून तिने 2017 साली अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. रविवारचा हा अंतिम सामना अडीच तास चालला होता. या स्पर्धेत कॅटलिन ख्रिस्टेन आणि मेरोझेव्हा या जोडीने महिला दुहेरीचे जेतेपद मिळविताना चीनच्या वेंग झिनयु आणि लीन यांचा 7-5, 6-3 असा पराभव केला.









