वृत्तसंस्था/ सालेम
2020 मधील आयपीएल क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरात किंवा श्रीलंकेत होवू शकते. तथापि या स्पर्धेचे स्वरूप थोडेफार बदलावे लागेल. प्रत्येक संघाला खेळविण्यात येणाऱया सामन्यामध्ये कपात करण्याची जरूरी आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केले आहे.
सालेम क्रिकेट 2020 संदर्भात बोलताना सुनील गावसकर यांनी आयपीएल क्रिकेट संदर्भातील आपले वैयक्तिक मत व्यक्त केले. कोरोना महामारी संकटामुळे भारतीय क्रिकेट मंडळाने 2020 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात घेतली जाणार होती पण आयसीसीने ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला तर याच कालावधीत आयपीएल क्रिकेट स्पर्धा भरविता येईल, असे गावसकर यांनी म्हटले आहे.
भारतामध्ये या कालावधीत मान्सूनचा हंगाम असल्याने आयपीएल स्पर्धेतील सामन्यामध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाने 2020 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा विदेशात भरविण्यासाठी विचार करावा. श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरात या दोन देशांच्या क्रिकेट मंडळाशी बीसीसीआयने संपर्क साधून यजमानपदाच्या ऑफरचा प्रस्ताव ठेवावा, असेही गावसकर यांनी सांगितले.
मात्र सदर आयपीएल स्पर्धा अधिक कालावधीसाठी लांबली जावू नये याची दखल घेत या स्पर्धेच्या सामन्यामध्ये कपात करावी, असेही गावसकर यांनी सुचविले आहे. सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक संघाला 14 सामने खेळावे लागतात. आता नव्या स्वरूपानुसार प्रत्येक संघाला 14 ऐवजी 7 सामने खेळण्याची तरतूद करावी. भारताबाहेर आयपीएल क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान भरविली जावू शकते, असेही गावसकर यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी भारतीय किकेट मंडळ आशावादी असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले. या संदर्भात गांगुली यांनी विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनांना लेखी पत्रेही पाठविली आहेत.
आयपीएल स्पर्धेच्या यजमानपदासाठी येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान बीसीसीआयकडून विंडो खुली करण्यात येईल, असे आयपीएल स्पर्धेच्या नियंत्रण समितीचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले पण गेल्या चार दिवसांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन शासनाने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे संकेत केले आहे. दरम्यान या स्पर्धेत 16 संघांचा सहभाग असून सदर स्पर्धा पुन्हा लांबणीवर पडेल, असा अंदाज गावसकर यांनी वर्तविला आहे. ऑस्ट्रेलियात सदर स्पर्धा घेतली गेली तर कोरोना संदर्भातील सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना महामारी नियमामध्ये पुढील सामन्यात काही प्रमाणात शिथिलता केली जाईल, असे संकेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिले आहेत.









