ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे होणाऱ्या स्कायवॉकच्या बांधकामातील अडथडा आता दूर झाला आहे. राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच चिखलदरा येथे जगातील सर्वात मोठा स्कायवॉक तयार होणार आहे.
अमरावतीत तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक 407 मीटरचा असणार आहे. जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी असलेल्या स्कायवॉकची लांबी कमी आहे. स्वीझरलँडचा स्काय वॉक 397 मीटर, तर चीनचा स्काय वॉक 360 मीटरचा आहे. त्यामुळे अमरावतीत तयार होणारा हा स्कायवॉक जगातील सर्वात मोठा असणार आहे.
या स्कायवॉक संदर्भात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक झाली होती. त्यावेळी स्कायवॉकच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुराव्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन परवानगी मिळवली. त्यामुळे स्कायवॉक तयार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.