बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात ड्रग तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीत होणारे ड्रॅग सेवन आणि तस्करी यासंबंधी सीसीबी पोलिसांनी कारवाई केली आहे. ड्रग प्रकरणात कन्नड अभिनेत्री संजना, अभिनेत्री रागिणी आणि अन्य व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान शुक्रवारी नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) विशेष खटल्याच्या विशेष कोर्टाने अभिनेत्री संजना गलराणी आणि सॉफ्टवेअर अभियंता प्रतीक शेट्टी यांना ३० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संजनाच्या वकिलांनी केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) तिच्यावरील आरोप निश्चित केलेले नाहीत आणि एनडीपीएस विशेष न्यायालयात हा खटला सादर केला नाही किंवा हस्तांतरित केलेला नाही, असा आरोप पहिल्या एसीएमएम न्यायालयासमोर केला. त्यामुळे संजनाला शुक्रवारी सायंकाळी एनडीपीएस कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी अभिनेत्री संजनाने विशेष कोर्टाच्या न्यायाधीशांकडे रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे तीला जमीन मिळावा अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने तिला ३० सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.