ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सुशंतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला आहे. सुशांत च्या कुटुंबीयांनी पाटणातील राजिवनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये त्यांनी रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोवित चक्रवर्ती, श्रुती मोदी इतरांविरुद्ध फसवणूक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा सुशांतला फिल्म लाइन सोडून केरळमध्ये सेंद्रिय शेती करायची होती, त्याचा मित्र महेश त्याच्याबरोबर कुर्गला जाण्यास तयार होता, जेव्हा रियाने सांगितले की, ‘तू कोठेही जाणार नाहीस. आणि जर तू माझे ऐकत नसशील तर मी तुझा मेडिकल रिपोर्ट मीडियात देईन आणि सर्वांना सांगेन की तू वेडा आहेस’.
जेव्हा रियाने पाहिले की सुशांत तिचं म्हणणं ऐकत नाही आणि त्याचा बँक बॅलन्स खूपच कमी झाला आहे, तेव्हा रियाला वाटले की आता सुशांत तिच्या काही उपयोगाचा नाही. सुशांतसोबत राहणारी रिया 8 जून रोजी रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, पासवर्ड, क्रेडिट कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक, सुशांतची महत्वाची कागदपत्रे आणि उपचारांची कागदपत्रे घेऊन सुशांतच्या घरुन निघून गेली होती.
दरम्यान, पाटण्यात रियाविरोधात तक्रार दाखल होताच आता कारवाईसाठीची पावलं उचलली जाण्यास सुरुवात झाली आहे. ज्याअंतर्गत बिहार पोलीस मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत.
तर दुसरीकडे रिया चक्रवर्ती आज कोर्टात अटकपूर्व जामीन साठी अर्ज करत कायद्याची मदत घेऊ शकते.









