प्रतिनिधी / बेंगळूर
कन्नड चित्रपट निर्माते कोटी रामू (वय 52) यांचे सोमवारी कोरोनाने निधन झाले. ते अभिनेत्री मालाश्री यांचे पती होत. आठवडय़ापूर्वी रामू यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना श्वसनासंबंधी विकारही होता. त्यामुळे त्यांच्यावर बेंगळूरच्या एम एस. रामय्या इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचे निधन झाले.
राजकीय घटनेवर आधारित गोळीबार, लॉकअप डेथ हे त्यांचे कन्नड चित्रपट लोकप्रिय ठरले होते. कलासीपाळय़, सीबीआय दुर्गा, एके-47, हॉलिवूड, मुत्तीनंथ हेंडती, हॅलो सिस्टर आदी चित्रपटांची निर्मिती कोटी रामू यांनी केली होती. युवा अभिनेते प्रज्ज्वल देवराज यांचा अभिनय असलेल्या ‘अर्जुन’ हा चित्रपट निर्मितीच्या टप्प्यात आहे. तो पूर्ण होण्याआधीच रामू यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त होत आहे.









