प्रतिनिधी / सिंधुदुर्ग
कोकणचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, कवी प्रकाश जाधव गेली अनेक वर्ष एकता कल्चरल अकादमीच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम राज्यस्तरावर राबवतात. या संस्थेतर्फे देण्यात येणारे 2019चे चित्रपट, साहित्य, विविध कला क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांना तर अनुवादाचा कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार प्रसिद्ध भाषांतरकार सुनिता डागा यांना तर लोकप्रिय अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांना प्रिया तेंडुलकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
11 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता गिरगाव येथील साहित्य संगम मंदिर मधे आयोजित करण्यात आलेल्या एकता सांस्कृतिक महोत्सवात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती एकता कल्चरचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली.
एकता कल्चरच्या इतर पुरस्कारांमध्ये दया पवार स्मृती पुरस्कार कवी विलास गावडे, दृश्य संकलक क्षेत्रातील शुभांगी सावंत यांना काशिनाथ बेनकर पुरस्कार, पत्रकार दुर्गेश सोनार यांना श्रीकांत पाटील स्मृती पुरस्कार, हरेश साठे यांना कवी नारायण पेडणेकर स्मृती पुरस्कार, संगीत क्षेत्रातील सुधीर फडके पुरस्कार सतीश पाटील यांना, शैक्षणिक क्षेत्रातील डॉ. उषा राव यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, तरुण प्रेरक वक्ता संकेत खर्डीकर यांना कल्पना चावला स्मृती पुरस्कार, कलाक्षेत्रातील लक्ष्मी कोल्हापूरकर स्मृती पुरस्कार सुनयkना गोसावी यांना, न्याय विधी क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार अॅड. अर्चना गायकवाड यांना, आनंद जाधव यांना समाजसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, किरण बडे यांना अहिल्याबाई रांगणेकर पुरस्कार, डॉ. गिरीश लटके यांना ज्योतिबा फुले पुरस्कार, संतोष धोत्रे यांना बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार, अशोक कांबळे यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अभिनेते प्रमोद पवार, कवी अजय कांडर, अभिनेत्री नीलांबरी खामकर, धनराज खरटमल आदींच्या पुरस्कार समितीने या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.