- अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई
ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करत बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला अटक केली आहे. या कारवाईमध्ये ध्रुवकडून 35 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले ही कारवाई मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलकडून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ध्रुव ताहिल मार्च 2020 पासून मुजम्मिल अब्दुल रहमान शेख नावाच्या एका ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी मुजम्मिलला अटक केली होती आणि यानंतर झालेल्या चौकशीमध्ये त्याने ध्रुव ताहिलला ड्रग्ज पुरवल्याचे मान्य केले होते.
आरोपी मुजम्मिलच्या मोबाइलची तपासणी करतानाच ध्रुव ताहिल आणि मुजम्मिल व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समजले होते. ध्रुव ताहिलने अनेकदा मुजम्मिलकडून ड्रग्ज मागवले होते. अशात 5 एप्रिलला मुंबई पोलिसांनी ध्रुवच्या घरावर छापा टाकत त्याला अटक केली.
याशिवाय ध्रुव ताहिलने मुजम्मिल याला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचेही पुरावे सापडले आहेत.दरम्यान, आतापर्यंत ध्रुव ताहिल अटकेबाबत अभिनेता दिलीप ताहिल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.