वयाच्या 43 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन : उपचारादरम्यान काम ठेवले होते सुरू
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
2018 मध्ये प्रदर्शित ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता चॅडविक बोसमॅन याचे निधन झाले. लॉस एंजिलिस येथील स्वतःच्या घरातच 43 वर्षीय चॅडविक यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चॅडविक हे सुमारे 4 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते.
चॅडविक यांना 2016 मध्ये तिसऱया स्टेजचा कोलोन कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोगावर त्यांनी अनेक शस्त्रक्रिया करवून घेत किमोथेरपीलाही तोंड दिले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांनी स्वतःचे काम सुरूच ठेवले होते. या कालावधीत त्यांनी ‘मार्शल’, डा 5 ब्लड्स’, ‘मा रेनीज ब्लॅक ब्लॉटम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. डा 5 ब्लड्स आणि मा रेनीज ब्लॅक बॉटम हे चित्रपट कोरोना महामारीमुळे प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत.
चॅडविक हे खरेखुरे लढवय्ये होते. स्वतःवरील अनेक शस्त्रक्रिया तसेच किमोथेरपीदरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे काम पूर्ण केले आहे. ब्लॅक पँथरमधील किंग टी-चल्लाचे पात्र साकारणे त्यांच्यासाठी सन्मानाची बाब होती. स्वतःच्या आजाराविषयी चॅडविक यांनी कधीच सार्वजनिक स्वरुपात भाष्य केले नाही असे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दक्षिण कॅरोलिनामध्ये जन्मलेले चॅडविक यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. 2013 पूर्वी ते टीव्हीवरील मालिकांमध्ये अभिनय करत होते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘42’ या अमेरिकन स्पोर्ट्स बायोग्राफिकल ड्रामामधील रॉबिन्सन या त्यांनी साकारलेल्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि त्यांना हॉलिवूडमध्ये स्टारपद मिळवून दिले. हा चित्रपट अमेरिकेचा माजी व्यावसायिक बेसबॉलपटू जॅकी रॉबिन्सन यांच्य जीवनावर आधारित होता.









