हेरातमध्ये सर्वाधिक नुकसान : 3 तासांत 6 भूकंपोत्तर धक्के
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्ताला शनिवारी दुपारी बसलेल्या भूकंपाच्या 6.3 तीव्रतेच्या धक्क्यानंतर बळींचा आकडा आता 2 हजाराच्या पार पोहोचला आहे. भूकंपामुळे जवळपास 6 गावे उद्ध्वस्त झाली असून शेकडो लोक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. 3 तासांत तेथे 6 भूकंपोत्तर धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या हेरात शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर होते.
हेरातमध्ये भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा हा जाहीर करण्यात आलेल्या संख्येपेक्षा अधिक आहे. ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्यात यावी असे आवाहन अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रेयान यांनी केले आहे. तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी तात्पुरती वास्तव्यसुविधा प्रदान करण्यासाठी तंबू, अन्न, औषधे स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करावीत असे म्हटले आहे. या भूकंपामुळे अफगाणिस्तानातील 465 घरे जमीनदोस्त झाली असून 135 घरांचे नुकसान झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात आली.
अफगाणिस्तानात भूकंपाचा धक्का शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार 12 वाजता) बसला होता. प्रारंभी भूकंपात 100 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात आले होते. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेनुसार अफगाणिस्तानात जाणवलेल्या भूकंपोत्तर धक्क्यांची तीव्रता 4.6 ते 6.3 रिश्टर स्केल इतकी होती.
यापूर्वी अफगाणिस्तानात 14 सप्टेंबर रोजी 4.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. मार्च महिन्यात झालेल्या भूकंपात सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 300 जण जखमी झाले हेते. अफगाणिस्तानात जून 2022 मध्ये झालेल्या भूकंपात सुमारे हजार लोकांना जीव गमवावा लागला होता.









