राज्यपाल रहमतुल्लाह यार्मल यांच्या ताफ्याला केले होते लक्ष्य
ऑनलाईन टीम / काबूल :
अफगाणिस्तानातील लघमनचे राज्यपाल रहमतुल्लाह यार्मल यांच्या ताफ्याला लक्ष्य करून त्यांच्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. आज सकाळी झालेल्या या हल्ल्यातून राज्यपाल थोडक्यात बचावले. मात्र, 8 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. तर 38 जण जखमी झाले आहेत. राज्यपालांचे प्रवक्ते असदुल्लाह डावलात्जई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
डावलात्जई यांनी टोलो न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी झालेल्या आत्मघाती हल्ल्याचे लक्ष्य राज्यपाल होते. तेे आपल्या गेस्ट हाऊसमधून ऑफिसला जात असताना ही घटना घडली. या हल्ल्यात चार नागरिकांसह राज्यपालांच्या चार सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जण जखमी झाले आहेत. सध्या कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.