ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर अफगाणिस्तान दहशतवादाचा बालेकिल्ला बनला आहे. या देशाला मानवतावादी मदत करणे आवश्यक आहे. अन्यथा तेथील परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे आज नवी दिल्लीत झालेल्या तिसऱ्या भारत-मध्य आशिया संवादादरम्यान भारतासह पाच मध्य आशियाई देशांनी अफगाणिस्तानच्या जनतेला तातडीने मानवतावादी मदत करण्याचे आवाहन केले. अफगाण प्रदेशाचा वापर दहशतवादी कारवायांना आश्रय देण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी, नियोजन करण्यासाठी किंवा वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाऊ नये, असे देशांनी म्हटले आहे.
मध्य आशियातील पाच देशांमध्ये कझाकिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. संवादादरम्यान या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, एकता आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याची गरज असल्याचे सांगितले. शांततापूर्ण, सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तानला सर्व मंत्र्यांनी पाठिंबा दर्शविला. दरम्यान, अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला नाही, असे या देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.