वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्टार लेगस्पिनर रशिद खानची अफगाणिस्तान टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केल्याचे अफगाण क्रिकेट मंडळाने जाहीर केले. येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱया टी-20 †िवश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून त्याची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
डावखुरा फलंदाज नजिबुल्लाह झद्रनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘अष्टपैलू रशिद खानची अफगाण टी-20 संघाच्या कर्णधारपदी आम्ही नियुक्ती केली आहे तर नजिबुल्लाह झद्रन या संघाचा उपकर्णधार असेल,’ असे अफगाण क्रिकेट मंडळाने पत्रकाद्वारे सांगितले. ‘रशिद हा जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेला खेळाडू असून त्याचा अनुभव आणि नेतृत्वगुण पाहून त्याच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे. टी-20 गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत रशिद खान सध्या दुसऱया स्थानावर असून नेतृत्वाच्या माध्यमातून देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने माझा सन्मानच झाला आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या. ‘अफगाणिस्ताननेच माझे रशिद खान हे नाव व ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून देशाची व संघाची सेवा करण्याची संधी मिळाली, ती पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे,’ असे तो म्हणाला. विशेष म्हणजे यापूर्वी एकदा त्याने संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिला होता. कर्णधारापेक्षा मी खेळाडू म्हणून जास्त महत्त्वाचा आहे, असे त्याने त्यावेळी म्हटले होते.
संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणचा ब गटात समावेश असून याच गटात इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. याशिवाय पात्रता स्पर्धेतून अन्य दोन संघांची निवड करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे भारतात होणारी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.









