एसी, फ्रिजच्या विक्रीवर परिणाम -बिगर महत्त्वाच्या वस्तुंवर निर्बंध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱया लाटेने महाराष्ट्रासह देशातील राज्यांमध्ये पुन्हा डोके वर काढल्याने याचा परिणाम विविध व्यवसायावर होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातही होम अप्लायन्सेसच्या विक्रीवर मोठा दबाव जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन व विविध निर्बंध लावले जात असल्याने अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱया विविध व्यवसायावर परिणाम होताना दिसतो आहे. अप्लायन्सेसच्या खपाच्या दृष्टीने एप्रिल हा महत्त्वाचा महिना मानला जातो. देशभरात उन्हाळय़ाची तीव्रता वाढते व मग होम अप्लायन्सेसच्या मागणीत वाढ होते. विशेषतः एसी, फ्रीज, कुलर सारख्या अप्लायन्सेसच्या मागणीत मोठी वाढ होत असते. गुढी पाडव्यापासून देशभरात विविध सण उत्सवांना प्रारंभ होत असतो. हा काळ खरेदीसाठी उत्तम मानला जात असल्याने शुभ दिवस पाहून खरेदीवर भर दिला जातो.
रमजान, रामनवमी असे सणही या महिन्यात साजरे होत आहेत. लोक उत्सवाच्या निमित्ताने बाहेर पडतात व खरेदीही करतात. पण सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाऊनचा अवलंब केला जात असल्याने लोकांनी घरी थांबणे पसंत केले आहे. यामुळे उत्पादकांसह विक्रेतेही दबावाखाली असल्याचे दिसून आले आहे. गोदरेजने यंदाच्या गुढी पाडव्याला विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे म्हटले आहे. विक्रीत कोणताही उत्साह पाहायला मिळाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. बिगर गरजेच्या वस्तुंच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घातल्याचा परिणाम होम अप्लायन्सेसच्या विक्रीवर दिसला आहे.









