रायबाग तालुक्यातील भेंडवाड येथील घटना
वार्ताहर /रायबाग
रायबाग तालुक्यातील भेंडवाड येथील गवळय़ाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. अर्जुन मॅगडी (वय 30) असे मृताचे नाव आहे. तसेच या घटनेनंतर 24 तासांत तीन संशयितांना अटक करण्यात रायबाग पोलिसांना यश आले आहे तर एक संशयित अद्याप फरारी आहे. भीमप्पा दुंडप्पा तट्टीमनी, लोकेश बंडिवड्डर आणि शिवनगौडा पाटील अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अर्जुन मॅगडी हा दूध विक्री करत होता. शुक्रवारी भेंडवाड गावच्या मंटूर क्रॉसजवळ चार संशयितांनी इंडिका कारमधून त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर संशयितांनी अर्जुन याचा कारमध्येच खून केला. तसेच सदर मृतदेह कोणालाही सापडू नये, यासाठी गोकाक तालुक्यातील मण्णिकेरी गावच्या कॅनॉलशेजारी फेकून चौघेजणही फरारी झाले होते.
दरम्यान, अर्जुनचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने रायबाग पोलीस स्थानकात दाखल केली होती. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी एस. व्ही. गिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने याचा तपास हाती घेतला. सीपीआय एच. डी. मुल्ला यांनी आपल्या सहकाऱयांसह खून केलेल्या तिघा आरोपींना अटक केली तर एकजण फरारी झाला आहे. पोलीस एस. वाय. तळवार, आर. बी. खानापुरे, एस. एस. चौधरी यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.









