प्रतिनिधी / पेठवडगाव
वडगाव पोलीस ठाण्यात गोपनीय पोलीस असल्याची बतावणी करून अपघातातील मयतेच्या नातेवाईकांना विमा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५७ हजार रुपये उकळून गंडा घालणाऱ्या ठकसेन तानाजी सावंत (रा. पेठवडगाव ता. हातकणंगले) याला पोलिसांनी गजाआड केले.
गेल्या अनेक वर्षांपासून तोतया पोलीस असल्याचे भासवून असह्य महिलेने भुलभुलैया करणाऱ्या तानाजी सावंत याच्या विरोधात चावरे येथील सुरेखा कृष्णात जाधव या आशा वर्कर्स या महिलेने तक्रार दिली. दरम्यान तोतया सावंत याची आतार्यंत केलेले कारनामे यानिमित्याने उजेडात येण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.
चावरे येथील सुरेखा कृष्णात जाधव या आशा वर्कर्स म्हणून काम करीत असलेल्या महिलेचा जावई संदीप पाटील यांचे अपघातात मृत्यू झाला. तोंडओळख असलेल्या तानाजी सावंत याने मी वडगांव पोलीस ठाण्यात गोपनीय पदावर पोलीस म्हणून काम करतो अशी बतावणी केली. तुमच्या जावयाच्या अपघातात विमा मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात कागदपत्रे व वकील देतो, असे आमिष दाखविले. यासाठी ६० हजार रुपयाची मागणी केली. दरम्यान सावंत याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चावरे येथील ताराराणी पतसंस्थेतील ६० हजार रुपयाचे कर्ज सुरेखा जाधव यांनी काढले. दरम्यान १७ जुलै २०२० रोजी नातेवाईकाच्या करवी रोख ५७ हजार रुपये दिले. उर्वरित ३ हजार रुपये कागदपत्रे दिल्यानंतर देण्याची हमी दिली. दरम्यान कामाबाबतसावंत याला फोन केल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने सुरेखा जाधव या महिलेने सावंत विरोधात वडगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार सावंत याच्यावर गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास आय. पी. एस. अधिकारी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहायक फौजदार दीपक पोळ हे करीत आहेत.