प्रतिनिधी / सातारा :
पवनचक्की कंपन्यांनी स्थानिक भूमिपूत्रांवर अन्याय करु नये. आठवडय़ामध्ये त्यांना कामगार कायद्यानुसार सोयीसुविधा द्याव्यात. तसे केले नाही मी तर या तालुक्याचा आमदार या नात्याने सूझलॉन कंपनीच्या कार्यालयाला मी स्वतः टाळे ठोकेन, सर्व प्रकल्प बंद करून जाण्यायेण्याचा रस्ता बंद केला जाईल, असा गर्भीत इशारा आमदार शिवेंद्रराजेंनी दिला आहे.
सुरुची निवासस्थानी सुझलॉन कंपनीतील कर्मचारी त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी शिवेंद्रराजे पत्रकारांशी बोलत होते. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा आणि पाटण तालुक्यात पवनचक्क्या उभ्या राहिल्या. चाळकेवाडी, ठोसेघर, वनकुसवडे, जांभे, चिखली या परिसरात पवनचक्क्या उभ्या असून त्यामुळे वीज निर्मिती झाली आहे. पवनचक्की कंपन्या डोंगरी भागात येवून उत्पन्नाचे साधन मिळते म्हणून स्थानिक लोकांनी अतिशय मातीमोल किमतीने आपल्या जमिनी या कंपन्यांना दिल्या. अनेक कंपन्यांनी फसवणूक सुद्धा केली. खोटया सह्या मारुन एजंटाकरवी जमिनी लाटल्या. पण सगळय़ांची एकच भावना होती की मुलांना नोकऱ्या मिळतील ही. स्व. भाऊसाहेब महाराज असल्यापासून या कंपन्यांना साथ दिली. ग्रामपंचायतींनी लागणारे ठराव दिले. रस्ते दिले. कुठे कोणी अडवणूक केली नाही. पण आजच्या घडीला या कंपन्यांकडून प्रामुख्याने सुझलॉन कंपनीच्या माध्यमातून स्थानिक मुलांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली जात आहे.
वेळोवेळी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. त्यावेळी काही मुलांना कामांच्या ऑर्डरी मिळाल्या होत्या. पण बाहेरचे कॉन्ट्रक्टर नेमायचे. बाहेरचे मजूर नेमायचे आणि आमच्या मुलांना इतर राज्यांमध्ये पाठवायचे. इतर राज्यात पाठवल्यावर त्यांना पगार परवडला नाही पाहिजे अन् त्यांनी नोकऱ्या सोडल्या पाहिजे ही गळचेपी भूमिका सुझलॉन कंपनीची आहे. या कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतो आहे. माझी या तालुक्याचा आमदार म्हणून सुझलॉन कंपनीच्या मॅनेजमेंटला विनंती आहे. अशा पद्धतीचे अन्यायकारक धोरण सुझलॉन कंपनीने घेवू नये. घेतले तर आम्हाला आंदोलन करायला लागेल व कंपन्यांना कुलुप ठोकण्याचे काम करण्यात येईल. स्थानिक तरुणांवर अन्याय होत असेल तर खपवून घेतला जाणार नाही. एक आठवडयाची मुदत सुझलॉन कंपनीला देतोय. आठवडय़ात कंपनीने काढलेल्या ऑर्डर मागे घेतल्या नाहीत तर साताऱ्यात असणारे रस्ते, कार्यालय, जनरेशनचे काम बंद पाडण्याचे काम मी स्वतः तेथे जाऊन करेन. त्यामुळे कंपनीने कामगारांना न्याय द्यावा.









