वार्ताहर/ चिकोडी
एकसंबा येथील हुक्केरी घराणे आणीबाणीच्या परिस्थितीवेळी सर्व जनतेसोबत राहण्याची परंपरा सदैव जोपासण्यात अग्रेसर आहे. केवळ शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता अनेकवेळा माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी स्वखर्चाने अनेकांना मदत केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत अन्नपूर्णेश्वरी फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या 5 महिन्यांपासून मतदारसंघातील गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट, दूध, भाजीपाला, मास्क, सॅनिटायझर वितरणासह लोकांची काळजी घेतली आहे. अशाच रितीने कोरोनाच्या संकटसमयी कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावणाऱया चिकोडी-सदलगा मतदारसंघातील 800 आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिकांना तब्बल 24 लाखाची मदत करण्यात येत आहे. मदतीचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन स्वप्नाली गणेश हुक्केरी यांनी केले.
आमदार गणेश हुक्केरी यांच्या 42 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकसंबा (नणदी) येथील अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कोरोना योद्धय़ांना आर्थिक मदतीचे वितरण करून त्या बोलत होत्या.
स्वप्नाली हुक्केरी पुढे म्हणाल्या, अन्नपूर्णेश्वरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले जात आहे. कोरोनाचा अत्यंत बिकट परिस्थितीत अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी सहाय्यिका व आशा कार्यकर्त्या स्वतःची पर्वा न करता समाजासाठी झटत आहेत. त्यांचे हे उपकार शब्दात करणे कठीण आहे. या सर्व योद्धय़ांचे जितके कौतूक करावे तितके थोडेच आहे. या महाभयंकर संकटाशी सामना करणाऱयांच्या पाठिशी संपूर्ण हुक्केरी परिवार असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. सर्व योद्धय़ांना तसेच सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर पाळण्याबरोबरच सरकारी नियमांचे पालन करुन कोरोनावर मात करण्यास सज्ज रहावे, असेही त्यांनी सांगितले.
अन्नपूर्णेश्वरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा निलांबिका हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी चिकोडी-सदलगा मतदारसंघातील सर्व कोरोना योद्धय़ांना आधुनिक पद्धती मास्कसह सुमारे 24 लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी ता. पं. सदस्य रविंद्र मिर्जे, उर्मिला पाटील, सतीश पाटील, विनोद कागे, शैलजा कागे, राजश्री जोल्ले, उत्तम पाटील, जयपाल बोरगावे, भारती सावनूरे, नंदा देसाई आदींनीही आपली मनोगते व्यक्त करुन माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी गतवर्षी महापूरप्रसंगी व यावर्षी कोरोनाच्या संकटकाळी बजावलेली सेवा व केलेली आर्थिक मदत या भागातील जनता कधीही विसणार नाही. केवळ भाषणबाजीद्वारे प्रसिद्धी न मिळवता प्रसंगी स्वखर्चाने देखील जनतेची सेवा बजावणाऱया या परिवाराने मतदारसंघातील प्रत्येक गावातील जनतेच्या हृदयपटलावर आपली जागा मिळवली असल्याचे गौरोद्गारही अनेकांनी व्यक्त केले.
व्यासपीठाऐवजी उपस्थितात बसले हुक्केरी सावकार
कार्यक्रमप्रसंगी माजी खासदार प्रकाश हुक्केरी व्यासपीठावर न बसता सर्वसामान्य उपस्थित मोजक्या कार्यकर्त्यांसह कोरोना योद्धय़ांसोबत बसल्याने प्रत्येकांच्या तोंडात नेता असावा तर असा अशी स्तुतीसुमने ऐकावयास मिळाली. अनेक आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मुखातून हुक्केरी कुटुंबियांच्या या मदतीचे कौतूक होत असल्याचे कार्यक्रमस्थळी ऐकावयास मिळाले.
आमदार गणेश हुक्केरी यांनी मुद्दामपणे या कार्यक्रमस्थळी येण्याचे टाळून कोरोनाच्या महाभयंकरप्रसंगी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली. याबद्दलही काही चाहते व कार्यकर्त्यांच्या तोंडातून कौतूक व्यक्त होत होते.
याप्रसंगी माजी खासदार प्रकाश हुक्केरी, एल. बी. खोत यांच्यासह सर्व आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी सहाय्यिका व आमदार गणेश हुक्केरी यांचे सर्व सहाय्यक उपस्थित होते.









