बेळगाव : अपघातात किंवा दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी 108 रुग्णवाहिकांचे चालक, परिचारक किंवा परिचारिका दाखल होत असतात. जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्याचे काम करतात. दोन दिवसांपूर्वी जांबोटी फॉरेस्ट नाक्मयाजवळ अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला आणण्यासाठी गेले असता त्याच्याकडील 61 हजार 500 रुपये त्यांना मिळाले. तातडीने ती रक्कम जखमीच्या कुटुंबीयांकडे प्रामाणिकपणे त्यांनी परत केली. याबद्दल त्यांचा जांबोटी येथील नागरिकांनी सत्कार करून गौरविले.
जांबोटी फॉरेस्ट नाक्मयाजवळ मोटारसायकल घसरून दत्ता जिरगे जखमी झाले होते. ते रस्त्यावरच विव्हळत पडले होते. तातडीने 108 क्रमांकावर संपर्क साधला. तेथील शिवानंद कडकभावी आणि गौतम यांनी रुग्णवाहिकेला याची माहिती दिली. त्यानंतर पायलट राघवेंद्र व परिचारक गौतम बाबुण्णावर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने दत्ता जिरगे यांना रुग्णवाहिकेत घातले. त्यानंतर दत्ता यांच्याकडे असलेली रक्कम त्यांना दिसली.
खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाताच सदर रक्कम तेथेच ठेवली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत असलेल्या दत्ता यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय हॉस्पिटलकडे दाखल झाले. त्यांनी तातडीने ही रक्कम कुटुंबीयांकडे सोपविली. या प्रामाणिकपणाबद्दल राघवेंद्र आणि गौतम बाबुण्णावर यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांच्यासह तालुका पंचायत माजी सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून कौतुक केले. रक्कम परत केल्याबद्दल खानापूर परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.









