प्रतिनिधी / सातारा
22 मार्च पासून एसटीची चाके थांबली आहेत. एसटीची जिल्ह्याच्या बाहेर चाके जात नव्हती. मात्र, आज दुपारी राज्य शासनाने काढलेल्या आदेशामुळे उद्यापासून सातारची एसटी मुंबई, पुण्याला जाणार आहे. तशा सूचना विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी दिल्या आहेत. दरम्यान, लॉक डाऊनमध्ये एसटीत बसायला भीती वाटत असली तरी गर्दी होणार हे निश्चित आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासुन बंद असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आंतरजिल्हा वाहतुक चालू करण्यास शासनाने परवागी दिली असल्याने दि. 20 पासुन सातारा विभागातून आंतरजिल्हा वाहतुक शासनाच्या निकषांचे पालन करुन चालू करण्यात आली आहे. हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ई पास अथवा कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. बसस्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेवून आवश्यकतेनुसार सकाळी 7.00 वाजलेपासून खालील मार्गावर बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सातारा-मुंबई सेंट्रल, सातारा-ठाणे-बोरीवली, सातारा-सायन-बोरीवली, सातारा-स्वारगेट, मेढा-सातारा-सोलापूर, मेढा-सातारा-नृसिहवाडी, मेढा-कोल्हापुर, वाई-मुंबई, वाई-सातारा-सोलापूर, वाई-स्वारगेट, कराड-सोलापूर, कराड-विटा, महाबळेश्वर-महाड-मुंबई, महाबळेश्वर-पंढरपूर, महाबळेश्वर-पुणे स्टेशन, पाटण-कराड-सोलापूर. पाटण-कराड-सांगली, फलटण-स्वारगेट, फलटण-पुणे स्टेशन, फलटण-सांगली, फलटण-अक्कलकोट, म्हसवड-इचलकरंजी, दहीवडी-कोल्हापूर, वडुज-सांगली असे वेळापत्रक आखले आहे.









