मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या कारवाईवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला होता. याला उत्तर देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु असल्याचा दावा केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेली कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही. न्यायालयाने सोपवलेल्या जबाबदारीनुसारच केंद्रीय तपास यंत्रणा आपलं काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाचे खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत, असा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आज ED ची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत.
Previous Article`अपेक्स’ प्रकरणी आयुक्तांनी खुलासा करावा
Next Article ओबीसी आरक्षणासाठी पंचायत समिती सदस्याचे अनोखे आंदोलन








