वृत्तसंस्था/ मुंबई
सरफराज खानचे नाबाद त्रिशतक (301) व आदित्य तरे, सिद्धेश लाड, शाम्स मुलाणी यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्ध अनिर्णीत सामन्यात तीन गुणाची कमाई केली. सरफराज खानच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात आघाडी घेत या सामन्याचा नूरच पालटला. विशेष म्हणजे, 2009 नंतर प्रथमच मुंबईच्या एका खेळाडूने रणजी स्पर्धेत त्रिशतकी खेळी साकारली, हे उल्लेखनीय ठरले. त्रिशतकी खेळी साकारणारा सरफराज हा मुंबईचा तिसरा खेळाडू ठरला.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱया उत्तर प्रदेशने पहिला डाव 8 बाद 625 धावांवर घोषित केला. आकाशदीप नाथ (115), उपेंद्र यादवचे शानदार द्विशतक (203) व रिंकु सिंग (84) यांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मोठी मजल मारली. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबईची एकवेळ 4 बाद 128 अशी बिकट स्थिती झाली होती. सलामीवीर जय बिस्ता (3), भुपेन लालवाणी (43), स्वप्नील आतर्डे (9) व हार्दिक तोमोर (51) या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही.
सरफराजचे नाबाद त्रिशतक, सिद्धेश-तरेचेही दमदार फलंदाजी
या बिकट स्थितीत सिद्धेश लाड व सरफराज खान यांनी पाचव्या गडय़ासाठी 210 धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. ही जोडी स्थिरावलेली असताना शतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या लाडला मोहम्मद सैफने बाद केले. लाडने 174 चेंडूत 98 धावा केल्या. लाड बाद झाल्यानंतर सरफराजने मात्र आपली फटकेबाजी कायम ठेवली. त्याने आदित्य तरेसोबत सहाव्या गडय़ासाठी 176 धावांची भागीदारी करत मुंबईला साडेपाचशेचा टप्पा गाठून दिला. तरेलाही शतक पूर्ण करता आले नाही, त्याला 97 धावांवर तंबूचा रस्ता धरावा लागला. सरफराजने मात्र खेळपट्टीवर ठाण मांडत कारकिर्दीतील पहिले त्रिशतक साजरे केले. त्याने 391 चेंडूचा सामना करताना 30 चौकार व 8 षटकारासह नाबाद 301 धावा फटकावल्या. शाम्स मुलाणीने त्याला चांगली साथ देत 65 धावांचे योगदान दिले. सरफराजच्या या दमदार खेळीमुळे मुंबईने पहिला डाव 166.3 षटकांत 7 बाद 688 धावांवर घोषित केला व 63 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. या आघाडीमुळे अनिर्णीत राहिलेल्या या सामन्यात मुंबईने तीन गुणाची कमाई केली.
संक्षिप्त धावफलक : उत्तर प्रदेश पहिला डाव 8 बाद 625 घोषित.
मुंबई पहिला डाव 166.3 षटकांत 7 बाद 688 घोषित (लालवाणी 43, सिद्धेश लाड 98, सरफराज खान नाबाद 301, आदित्य तरे 97, शाम्स मुलाणी नाबाद 65, रजपूत 3/133, मोहम्मद सैफ 2/54).
सरफराज ठरला मुंबईचा आठवा त्रिशतकवीर
युवा फलंदाज सरफराज खानने उत्तर प्रदेशविरुद्ध 391 चेंडूत नाबाद 301 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्रिशतकी खेळी साकारणारा तो मुंबईचा आठवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, मुंबईकडून संजय मांजरेकर (1991), विजय मर्चंट (1943), सुनील गावसकर (1982), अजित वाडेकर (1967), वासीम जाफर (1996), वासीम जाफर (2009) व रोहित शर्मा (2009) यांनी त्रिशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे, मुंबईकडून शेवटचे त्रिशतक रोहित शर्माने 2009 मध्ये झळकावले होते. यानंतर, तब्बल 11 वर्षानंतर सरफराजने त्रिशतक झळकावत मुंबईची मान उंचावली आहे.
महाराष्ट्राचा आसामवर 218 धावांनी दणदणीत विजय
गुवाहाटी : रणजी चषक स्पर्धेत महाराष्ट्राने आसामवर 218 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, महाराष्ट्राचा पहिला डाव 175 धावांत आटोपल्यानंतर आसामने 244 धावा करत 69 धावांची आघाडी घेतली. यानंतर, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी दमदार खेळी साकारत दुसरा डाव 9 बाद 365 धावांवर घोषित करत आसामला विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य दिले. विजयासाठीच्या आव्हानाचा पाठलाग करताना आशय पालकर (42 धावांत 6) व मुकेश चौधरी (30 धावांत 3 बळी) यांच्या भेदक माऱयासमोर आसामचा डाव अवघ्या 78 धावांवर आटोपला गेला.
इतर सामन्यांचे निकाल –
- विदर्भ 179 व 330/3 घोषित वि दिल्ली 163 व 348/4, दिल्ली 6 धावांनी विजयी
- उत्तराखंड 227 व 273 वि झारखंड 298 व 203/4, झारखंड 6 गडय़ांनी विजयी
- गुजरात 281 व 167 वि पंजाब 229 व 109, गुजरात 110 धावांनी विजयी.









