महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात – श्रीकृष्णाचा बद्धवैरी । वपनें विटंबिला जो समरिं । ऐसा असतांही अंतरिं । भग्नीस्वकुमरीस्तव द्रवला। कैसा द्रवला म्हणसी राया । तरी भगवंताची अगाध माया । जिणें मोहिलें जगत्रया। ते तत्कार्या प्रवर्तवी ।भगिनीचिया स्नेहादरें। कन्याही दिधली सप्रेमभरें । वैर असतांही सोयरे। ऐशा प्रकारें ते झाले।रुक्मवतीचिये जठरिं । प्रद्युम्नवीर्यें जन्मला क्षत्री । अनिरुद्ध नामा अपर शौरि । जो अजिंक समरिं सुरासुरां ।लावण्यरसाचा पुतळा। गुणगणमंडित यौवनकळा । प्रतापें तुळितां ज्याचिया बळा । शक्रही आगळा हों न शके । रुक्मी ऐशा दौहित्रातें । नोवरा योजि स्वपौत्रीतें। रोचनेच्या लावण्यातें । समता चित्तें जाणोनी । आपुल्या दौहित्राकारणें । पौत्री रोचना कलत्र करणें । एवं स्नेहाच्य अवतरणें । द्वेषाचरणें सांडवला । अन्न न भक्षिजे द्वेष्टय़ाचें । आपुलें त्यासी न दीजे साचें । हेंचि कारण अधर्माचें । जें उभयां स्नेहाचें सुहृदत्व । उभयांमाजी द्वेष असतां। विवाहसंबंध तो अधर्मता । जाणत जाणत करूं जातां । विघ्नावर्तावर पडती । ऊर्ध्वगतीचे नाशकर। अपकीर्तिदायक लोकोत्तर । धर्मानुकूळही असतां चतुर । न होती तत्पर ते कर्मी । तस्मात् रुक्मि भगवद्द्वेष्टा । परंतु भगिनीस्नेहाभीष्टा । भजूनि करितां सुहृदनि÷ा । पावला कष्टा तद्योगें ।
श्रीकृष्णांकडून अपमानित झाल्यामुळे जरी रुक्मीच्या मनातील वैर कायम होते, तरीसुद्धा आपली बहीण रुक्मिणी हिला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपली नात रोचन हिचा विवाह रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याच्याशी लावून दिला. अशा प्रकारचा विवाह-संबंध शास्त्रविरुद्ध होता, हे रुक्मीला माहीत असूनसुद्धा बहिणीच्या प्रेमाखातर त्याने असे केले. लोकविरुद्धाचरण करितां । वरपडें होइजे विघ्नावर्ता। हें राहटीमाजी मन्मथजनिता । दावी तत्त्वता वर्तूनी । रुक्मरथादि बन्धुगण । द्वारकाभुवना पाठवून । स्वपौत्रीचें कन्यादान । दौहित्रातें नेमिलें । तया विवाहोत्सवाच्या ठायीं। रामकेशव स्वसमुदायीं । सन्नद्ध बद्ध होवोनि पाहीं। जाते झाले भोजकटा । रति रुक्मवती वरमाता। रेवती रुक्मिणी तयांसहिता। शिबिकायानीं उत्साहभरिता । जाती तत्वता लग्नासी । जाम्बवतीचे साम्बप्रमुख । प्रद्युम्नादि रुक्मिणीतोक।
सात्यकिउद्धवाक्रूरादिक । सेनानायक दळभारिं ।
प्रविष्ट झाले भोजकटीं । सम्मुख रुक्मि पातला भेटी। विसरूनि मागल्या द्वेषगोष्टी । स्नेहसंतुष्टी आळिंगी । करूनि सीमान्तपूजन । जानवशाचें दाविलें स्थान । शिबिरें देवोनि जनार्दन । तेथ ससैन्य उतरला । अनिरुद्धाच्या विवाह सोहळय़ासाठी भगवान श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी, प्रद्युम्न, सांब इत्यादी भोजकट नगरीला आले. पूर्वीचे सर्व वैर बाजूला सारून आपल्या नातीच्या लग्नासाठी आलेल्या सर्वांचे रुक्मीने यथोचित स्वागत केले. विवाह मोठय़ा थाटामाटात संपन्न झाला.
लोकविरुद्धधर्माचरण ।तें केलिया बाधी विघ्न ।
कैसें म्हणसी तें व्याख्यान । ऐकें येथून सांगतसें ।
विवाहसमारंभ संपला । उभयपक्षीं आनंद झाला ।
अकस्मात तो विघ्नघाला । उदया आला दुर्दैवें ।
Ad. देवदत्त परुळेकर








