ऑनलाईन टीम / सातारा
अनाथांची माय म्हणून परिचित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी विवाह आणि त्यानंतर पडलेल्या जबाबदाऱ्या या संघर्षामुळे त्या समाजसेवेकडे वळाल्या. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी हजारो अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.
सिंधुताईंच्या सामाजिक कार्याची दखल घेत काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ किताब दिला होता. 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, 2010 साली महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास 750 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.









