आर्थिक व्यवहार पूर्वपदावर : कोरोना नियमावली पायदळी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा अनलॉक होताच आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. मागील दीड ते दोन महिने थांबलेले आर्थिक व्यवहारही पूर्वपदावर येत आहेत. आर्थिक व्यवहार वाढल्याने बँकांमध्ये गर्दी होत आहे. परंतु काही ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाला पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र बेळगाव शहरात दिसत आहे.
नवीन पासबुक काढणे, बँकांमध्ये पैसे भरणे व काढणे, एटीएम, नेट बँकिंग, कर्ज यासह इतर कामांसाठी पुन्हा एकदा बँकांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. सध्या ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी बस सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकही शहरात दाखल होऊन आर्थिक व्यवहारांसाठी बँकांमध्ये येत आहेत. काही मोजक्मयाच व्यक्तींना बँकेमध्ये प्रवेश दिला जात असून जोवर आतील व्यक्ती बाहेर येत नाही तोवर बाहेरच्या लोकांना ताटकळत थांबावे लागत आहे.
पेन्शनसाठी गर्दीत वाढ
निवृत्त, दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा व्यक्तींना प्रतिमहिना पेन्शन दिली जाते. ही पेन्शन त्यांच्या खात्यांमध्ये जमा होते. परंतु मागील दोन महिन्यांपासून कोरोनामुळे नागरिक बॅंकांपर्यंत पोहोचू शकले नसल्यामुळे अनलॉक होताच आता झुंबड उडाली आहे. त्यातच काही बँकांचे विलिनीकरण झाल्याने ग्राहकांनाही अनेक समस्या येत असून त्यासाठी बँकांचे उंबरटे झिजवावे लागत आहेत.
सामाजिक अंतराची ऐशीतैशी
कोरोना अद्याप गेलेला नाही, याचे भान नागरिक विसरले आहेत. त्यामुळेच काही बँकांमध्ये झुंबड उडत आहे. हे चित्र असेच राहिल्यास पुन्हा लॉकडाऊनची स्थिती येईल याचा विसर पडला आहे. बँकांच्या आतमध्ये जरी सामाजिक अंतर पाळले जात असले तरी बाहेर मात्र होणारी गर्दी काळजीचे कारण ठरत आहे. बँकांच्या सुरक्षा रक्षकांकडून सूचना करूनही पाळल्या जात नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.









