2 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक ; 5 पासून तिसऱया टप्प्यातील अनलॉक शक्य
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची घोषणा केली आहे. दुसऱया टप्प्यातील अनलॉकचा कालावधी 5 जुलै रोजी सकाळी संपणार आहे. त्यामुळे त्याच दिवसापासून अनलॉक 3.0 जारी होण्याची शक्यता असून शुक्रवार दि. 2 जुलै रोजी याची घोषणा होणार असल्याचे समजते.
कोरोना नियंत्रणात येत असून विविध क्षेत्रांवर असणारे निर्बंध हटविण्यात येणार आहेत. तर बाजारपेठेसाठी लागू करण्यात आलेले नियम आणखी शिथिल होणार असल्याची चर्चा आहे. अनलॉक 3.0 जारी करण्यासंबंधी शुक्रवार 2 जुलै रोजी सायंकाळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली कोरोना नियंत्रणासंबंधी नेमण्यात आलेले मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक होणार आहे. या बैठकीत साधक-बाधक मुद्दय़ांचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री अनलॉकसंबंधीची घोषणा करतील, असे समजते.
मॉल सुरू होण्याची शक्यता
5 जुलैपासून मॉल, चित्रपटगृहे, पब-क्लब यांच्यावरील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. मंगळवारी शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन मॉल सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली. याविषयी प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा म्हणाले, काही शर्तींवर मॉल सुरू करण्यास परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. याविषयी मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे 5 जुलैपासून राज्यातील मंदिरेही भाविकांसाठी खुली होण्याची शक्यता आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना धर्मादाय मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी म्हणाले, देवदर्शनासाठी भाविक आतूर झालेले आहेत. मात्र, तज्ञांनी एकाच वेळी शेकडो लोकांना मंदिरात प्रवेश दिल्यास समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे याविषयी अद्याप ठोस चर्चा झालेली नाही. कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश द्यावा का, यासंबंधी चर्चेनंतरच निर्णय घेतला जाणार आहे, असेही कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले.









