कोरोना विषाणूने आलेल्या महामारीच्या संकटातून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही. पण अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक आणि दैनंदिन व्यवहार सुरू होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने 1 जूनपासून 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. पण या टप्प्याला लॉकडॉऊन 5 असे न म्हणता अनलॉक 1 असे नाव देण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. आता दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आर्थिक व्यवहार सुरळीत व्हायला काही वेळ जाईल. पण बाजारालाही एक दिलासा मिळाला आहे आणि त्याचे प्रत्यंतर सोमवारच्या शेअर बाजारांतील व्यवहारांवरून दिसून येईल.
गेल्या आठवडय़ात शेअर बाजाराची चाल अपेक्षेच्या पूर्णपणे विपरीत होती. खरे तर बाजारांत फारशी तेजी येणार नाही आणि एका मर्यादेतच बाजार फिरत राहील अशी अपेक्षा होती. पण बाजारांत जबरदस्त तेजी आली. बाजारांची वाटचाल निश्चित दिशेने झाली आणि निर्देशांकही चांगलेच वर आले आहेत. निफ्टी तर 600 अंकांच्या मर्यादेत फिरत होता, ही मर्यादा अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठी होती. गेल्या तीन सत्रांत निर्देशांक खालच्या पातळीवरून उसळून मजबूती दर्शवत बंद झाला होता. यामुळे निफ्टीला गेल्या आठवडय़ात चांगली 541 अंकांची तेजी मिळाली. आठवडय़ाचा विचार केला तर निफ्टीत 5.99 टक्के तेजी दर्शवली.
अर्थात संपूर्ण मे महिन्याचा विचार केला तर बाजारात अस्थिरता होती. पण शेवटच्या आठवडय़ात बाजाराला एक दिशा दिसताना दिसली. अजूनही काहीशी अस्थिरता आहेच, पण बाजाराचा कल सकारात्मकतेकडे असल्याचे दिसून येत आहे.
बाजारांची चाल लॉकडाऊनबाबत काय निर्णय होतो यावर बरीच अवलंबून असणार आहे. आता केंद्र सरकारने हळूहळू काही व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. ज्या भागात कोविड-19चा फैलाव जास्त आहे ते भाग वगळून अन्यत्र लॉकडाऊन टप्पटप्याने उठवण्यात येणार आहेत. अनेक निर्बंध शिथिल करून लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे तशी बाजारातही एक उमेद जागवली आहे.
आता मे महिन्यात ऑटो क्षेत्राची मासिक विक्री आकडेवारी जाहीर व्हायला सोमवारपासून सुरूवात होईल. त्याचाही परिणाम शेअर बाजारांच्या हालचालीवर होईल.
कोविड-19 च्या आघातानंतर शेअर बाजारात चांगलीच पडझड झाली. पण यातूनही बाजार सावरले आणि सावरत आहे. 9000च्या खाली गेलेल्या निफ्टीने आता 9500 ची पातळी गाठली आहे. आता लहान आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे मिळवण्याची संधी आहे. कारण कोविड-19च्या फैलावामुळे झालेल्या बाजारांच्या पडझडीत अनेक मध्यम कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती चांगल्याच घसरल्या आहेत. सध्याच्या किमतीने ते शेअर्स विकत घेण्याचा मोह कुणालाही होईल. पण बाजारात गुंतवणूकदारांमध्ये अजून भीती आहे. वास्तविक पाहता आता गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत आणि आता त्याचा लाभ आपण उठवला पाहिजे.
बाजारात प्रमाणाबाहेर विक्री झाली होती आणि कोविड-19च्या रूपात भीतीही अवतरली होती. सरकारचे धोरण काय असेल याबाबत संभ्रम होता. पण नंतर सरकारने सर्वच क्षेत्रांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आणि त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.
आता गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत. या वर्षअखेरपर्यंत गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी करणे हिताचे ठरेल. तोपर्यंत अमेरिका-चीन वाद, अमेरिकेतील निवडणुका याबद्दलचे चित्रही स्पष्ट होईल.
सेन्सेक्सही गेल्या आठवडय़ात 5.3 टक्क्मयांनी वाढला. बहुतांश राज्य सरकारे लॉकडाऊन शिथिल करतील अशी अपेक्षा आहे. आता देशांतर्गत विमानसेवाही सुरू झाली आहे. इतरही प्रवासी वाहतूक सुरू होऊ लागली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये वाद आहे. तसा भारत आणि चीनमध्येही सीमेवरून वाद पेटला आहे. भारत आणि चीन दोघांनीही हा वाद चर्चेद्वारे सोडवू असे सांगून युद्ध होणार नाही याची ग्वाही दिली आहे. कोविड-19मुळे आधीच गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी खाईत लोटण्याची चीनचीही तयारी नाही आणि भारताची तर अजिबातच नाही. मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढतच राहिली तर सरकार कोणती पावले उचलणार याची चिंता आहेच. पण तोपर्यंत तरी बाजारात सकारात्मक वातावरण राहील अशीच अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात लहान आणि मध्यम कंपन्यांचे शेअर्स मंदीतच होते. तरीही ओरिएंट सिमेंट, सुबेक्स, एओईसी, जेबीएफ इंडस्ट्रीज, आलोक इंडस्ट्रीज, प्रोझोन, बिर्ला कॉर्प आणि स्किपर यांनी चांगली तेजी दर्शवली. त्याचबरोबर आरबीएल बँक, गोदरेज प्रॉपर्टीज, द फेडरल बँक, फ्युचर रिटेल आणि जिंदाल स्टील अँड पॉवर यासारख्या कंपन्यांनी 10 ते 30 टक्क्मयांची तेजी दर्शवली.
या आठवडय़ातही लहान आणि मध्यम कंपन्यांवरच लक्ष केंद्रीत करणे हितकारक ठरेल.
– संदीप पाटील,
शेअरबाजार अभ्यासक









