महांतेशनगर, कणबर्गी रोड परिसरात कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका हद्दीत लावण्यात येणाऱया जाहिरात फलकांच्या शुल्क आकारणीसाठी महापालिकेने कंत्राट दिले आहे. मात्र कंत्राटदाराला वर्कऑर्डर देण्यात आली नसल्याने शहर आणि उपनगरांत अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. सदर फलक हटविण्याची कारवाई दोन दिवसांपासून सुरू आहे. सोमवारी महांतेशनगर परिसरातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची कारवाई मनपाकडून करण्यात आली.
जाहिरात फलक लावण्यासाठी मनपाकडून परवानगी घ्यावी, असे आवाहन सातत्याने केले जाते. मात्र परवानगी घेण्याकडे दुर्लक्ष करून शहरात अनधिकृत फलक लावण्याकडे व्यावसायिक आणि नागरिकांचा कल वाढला आहे. जाहिरात फलक शुल्क आकारणीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला यापूर्वी प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे अनधिकृत फलक लावण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र अलीकडे महापालिकेने निविदा काढून जाहिरात शुल्क आकारणीचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निविदा प्रक्रियेत कंत्राटदार निश्चिंत झाला आहे. पण कंत्राटदाराने अनामत रक्कम भरणा केली नसल्याने वर्कऑर्डर देण्यात आली नाही. अनामत रक्कम भरल्यानंतर वर्कऑर्डर दिली जाणार आहे.
शहरातील व्यावसायिक, नागरिक व काही संस्था काही ठिकाणी अनधिकृतरित्या कटआऊट्स व जाहिरात फलक लावत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेने हाती घेतली आहे. शहरातील जाहिरात फलक, कटआऊट्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. सोमवारी उपनगरांतही मोहीम राबविण्यात आली. महांतेशनगर तसेच कणबर्गी रोड परिसरात रस्त्याशेजारी लावण्यात आलेले जाहिरात फलक हटविण्यात आले. विविध चौक आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱया ठिकाणी लावण्यात आलेले जाहिरात फलक काढले. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.









