नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत वडगाव-अनगोळ रस्ता स्मार्ट बनविण्यासाठी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सदर रस्त्यावरील नाल्याचे बांधकाम हाती घेवून महिना झाला. नाला बांधकामासाठी रस्त्यावरील वाहतूक ओमकार नगर रस्त्याने वळविण्यात आली आहे. पण नाला बांधकाम अद्याप ठप्पच असून काम कधी पूर्ण होणार याकडेच नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. काही अतिक्रमणे आणि इमारती हटवून हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. सध्या गटारी बांधण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच ओंमकार नगर परिसरात नाल बांधकाम करण्यात येत आहे. नाला बांधकाम सुरू करण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक ओंमकार नगरमधील रस्त्याने वळविण्यात आली आहे. काम सुरू करून महिना उलटला तरी अद्याप कामकाज ‘जैसे थे’ आहे. नाला बांधकाम ठप्प झाले असून, काम कधी सुरू करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विहिरीचे पाणी दूषित होण्याची शक्यता
बांधकामाकरिता नाल्याचे सांडपाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे पाणी विहिरीमध्ये झिरपत आहे. तसेच वाहतूक वळविण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. नाल्याचे बांधकाम तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी होत आहे.









