गावातील सर्वच मंदिरांमध्ये पूजाअर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनासह इतर साथीच्या आजारांनी जनता त्रस्त झाली आहे. जनावरांनाही विविध आजारांची लागण होत आहे. याचबरोबर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. गावामध्ये मृत्यूचा दर देखील वाढला आहे. या गावावर संकट आले असून ते संकट दूर क्हावे, या मागणीसाठी अनगोळमधील विविध मंदिरांतील देवीदेवतांची ओटी भरण्याचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला.
श्री कलमेश्वर मंदिर येथून सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कलमेश्वर मंदिराची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर वाजतगाजत महालक्ष्मी मंदिर, गणपती मंदिर, मरगाई मंदिर, रेणूकादेवी मंदिर, भावकाईदेवी मंदिर, भरमदेव, भैरीदेव मंदिर, मारुती मंदिर याचबरोबर गावातील 21 मंदिरांमध्ये जावून ओटी भरण्यात आली.
कोरोना तसेच इतर आजारांचे संकट दूर होण्यासाठी पाच वार पाळण्यात आले होते. त्यानंतर गावामध्ये हा ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला. कलमेश्वर मंदिरामध्ये होमहवन-पूजादेखील करण्यात आली होती. गावातील मंदिरांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमाला गावातील ज्ये÷ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पंचमंडळी, कलमेश्वर शेतकरी संघटनेचे सदस्य तसेच महिला उपस्थित होत्या.









