प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेच्यावतीने अनगोळ परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. धर्मवीर संभाजी चौक, वाडा कंपाऊंड येथील सरकारी दवाखान्याच्या मागील बाजुला असलेल्या भंगीबोळात एक मुतारी होती. पण त्या ठिकाणी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आणि भाजी विपेत्यांनी भाजी, पालापाचोळा टाकून दिला होता. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. दवाखान्याला लागूनच ही जागा असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. त्याची दखल घेवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी बसवराज होसमनी, सुपरवायझर परशुराम चव्हाण यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आले. त्या ठिकाणी आता कोणीही कचरा टाकला तर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तरी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले. यावेळी सूचना फलकही लावण्यात आला आहे. त्याचे उद्घाटनही करण्यात आले आहे. यावेळी चंद्रु हिरेमठ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मरगाई मंदिर परिसरातही स्वच्छता
मरगाई मंदिर परिसरातही कचरा फेकण्यात येत होता. त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामुळे तो परिसर स्वच्छ करुन त्या परिसरातच एक सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. या परिसरातून कचरा फेकला जात असल्यामुळे मराठी शाळा क्रमांक 6, अनगोळ, वडगाव, भाग्यनगर या परिसरात जाणाऱया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. आता कोणीही या ठिकाणी कचरा टाकु नये अन्यथा त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरवाजात घंटागाडी आल्यानंतर कचरा द्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.









